Nashik Crime News : कामठवाड्यातून सराईत दुचाकी चोराला बेड्या, 3 दुचाकी हस्तगत | पुढारी

Nashik Crime News : कामठवाड्यातून सराईत दुचाकी चोराला बेड्या, 3 दुचाकी हस्तगत

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका सराईताला सापळा रचत अटक करून त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

अंबड पोलीसठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार प्रविण राठोड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती हा सोनी पार्कच्या बाहेर, धन्वंतरी मेडिकल कॉलेज जवळ, कामटवाडा शिवार याठिकाणी एका काळया रंगाच्या मोटार सायकलवर बसलेला असून त्याच्या जवळ होन्डा कंपनीची चोरीची मोटर सायकल आहे. त्याने ती मोटर सायकल विक्री करण्यासाठी आणली आहे. या बातमी नुसार अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून संशयित केतन गणेश भावसार (२०, रा- नंदिनी दुकानाच्या मागे अष्टविनायक चौक, सुभाषचंद्र बोस गार्डन जवळ, सावतानगर, नाशिक) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अंबडच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून ९० हजार रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकल हस्तगत केल्या. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राउत, सहायक आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख, अंमलदार किरण गायकवाड, पवन परदेशी, प्रवीण राठोड, राकेश राऊत, सागर जाधव, घनश्याम भोये, दिपक निकम, राकेश पाटील, अनिल गाढवे, तुषार मते, सचिन करंजे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पुढील तपास हवालदार अतुल बनतोडे व प्रदीप वाघ करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button