Nashik I भावनिक गुंतवणूक करण्यात ठाकरे यशस्वी ! | पुढारी

Nashik I भावनिक गुंतवणूक करण्यात ठाकरे यशस्वी !

नाशिक : मिलिंद सजगुरे

पक्षामध्ये प्रचंड पडझड होऊनही शिवसेना उबाठा गटाचे नाशिकमधील राज्यव्यापी अधिवेशन उत्साहवर्धक ठरल्याचे म्हणता येईल. तब्बल अठ्ठावीस वर्षांच्या अंतराने नाशकात दुसऱ्यांदा झालेल्या या अधिवेशनाचे फलित काय याचा लेखाजोखा आगामी सार्वत्रिक निवडणुकीत होणार असला तरी कार्यकर्त्यांतील मरगळ झटकण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिनीचे इतर नेते यशस्वी झाल्याचा निष्कर्षही काढता येऊ शकतो.

साधारणत: दीड वर्षापूर्वी अभेद्य शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी मोठे भगदाड पाडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पदच्युत केले आणि स्वत: मुख्यमंंत्रिपदी विराजमान होण्याची किमया साधली होती. शिवसेनेचे तेरा खासदार आणि चाळीस आमदार यांसह हजारो पदाधिकारी-कार्यकर्तेही मातोश्रीसोबत प्रतारणा करीत शिंदेंच्या पालखीचे भोई बनल्याने उ‌द्धव ठाकरे कमालीचे घायाळ झाले. नाशिकमधील अधिवेशनाला पक्षफुटीची पार्श्वभूमी लाभल्याने त्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. मात्र, भगूरस्थित स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक भेट, काळाराम मंदिर दर्शन आणि गोदातीरी महाआरती या कार्यक्रमांना इव्हेंटचे स्वरूप देत ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला योग्य वातावरणनिर्मिती करण्यात यश मिळवले. आमचा पक्ष संपला नसून अजून बरेच काही शिल्लक असल्याचे त्यांनी अवतीभोवती शागीर्दांची प्रचंड गर्दी करून विरोधकांना दाखवून दिले. अधिवेशनस्थळी ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केलेल्या भाषणांनीही कार्यकर्त्यांत ऊर्जा भरली. राज्यभरातून आलेले पदाधिकारी-कार्यकर्ते तिथल्या वातावरणाने सुखावले नसल्यास नवलच.

अधिवेशनाच्या सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदावरील सभेलाही लक्षणीय गर्दी दिसून आली. पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आक्रमक भाषणांनी केलेल्या वातावरण निर्माणावर पक्षप्रमुख उद्धव यांनी जोषपूर्ण भाषण करून कळस चढवला. पक्ष संक्रमणावस्थेतून मार्गाक्रमण करीत असला, खासदार-आमदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला असला आणि स्वत: ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या मागे चौकशांचे शुक्लकाष्ठ लागले असले तरी ‘हम लढते रहेंगे’ हा संदेश उद्धव यांनी भाषणादरम्यान दिला. केंद्र-राज्यात सत्तेमधल्या नेत्यांवर कठोर शब्दांत हल्ला चढवून ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रामराज्यासाठी ‘दार उघड बाई दार..’ हे जगदंबेला घातलेले साकडे १९९४ च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या स्मृती जागवून गेले. कार्यकर्त्यांत जागवलेली नवचेतना पक्षाला आगामी निवडणुकांत कितपत लाभदायी ठरते, हे येणारा काळ ठरवणार असला तरी प्राथमिक अंगाने किमान पुुढील काही काळासाठी सैनिकांचे बाहू स्फुरत राहतील, एवढी भावनिक गुंतवणूक करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाल्याचा निष्कर्ष काढण्यास पुरेसा वाव मिळतो.

नवचेतनेचे स्फुल्लिंग जागवले खरे, पण….

शिवसेना उबाठा गटाच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांत नवचेतनेचे स्फुल्लिंग जागवले गेले असले तरी पक्षाची राजकीयदृष्ट्या पुनर्भरारी, विकलांग झालेले संघटन, जिल्हास्तरावर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी, भाजप आणि शिंदे गट यांची दिवसागणिक वाढणारी ताकद, मतदारांना कोणत्या मुद्द्यांनिशी सामोरे जायचे आदी मुद्दे अनुत्तरित राहिल्याची भावना निष्ठावंत म्हणवल्या जाणाऱ्या सैनिकांना सतावत असणार. उद्धव ठाकरे यांच्यासह अवघ्या नेतेमंडळींच्या भाषणांचा रोख भाजप, शिंदे गट तसेच केंद्र-राज्याच्या सत्तेमधील बड्या नेत्यांवर शाब्दिक आसूड ओढण्याकडे जाणवला. आक्रमक भाषणांद्वारे कार्यकर्त्यांकडून टाळ्या मिळवणे जितके सोपे असते, त्याहून कठीण त्यांच्यामध्ये विचारांची पेरणी करून पक्षाला यशालेख गाठून देणे ही बाब असते. केवळ विरोधकांवर कठोर शब्दप्रहार करून पक्षाला गतवैभव प्राप्त होईल का, असा प्रश्न मनात घोळलेल्या सैनिकांना अधिवेशनातील उपस्थितीने सोबत काय शिदोरी मिळाली, ही सल मात्र अगदी पुढील अधिवेशनापर्यंत सतावत राहिली तर त्यामध्ये नवलाई बिलकुल असणार नाही. सारांशात, सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशकात पार पडलेले अधिवेशन कितपत फलदायी ठरले, याचे प्रतिबिंब निवडणूक निकालातून दिसेल, याबाबत शंका असू नये.

हेही वाचा:

Back to top button