नाशिक : पार्किंगमध्ये वाहन लावण्यावरून झालेल्या वादातून दोन दाम्पत्याने एकमेकांना मारहाण, विनयभंग केल्याची घटना पंचवटीतील कुमावतनगर परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी मारहाण विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. रविवारी व सोमवारी (दि. २१ व २२) हा प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
नाशिक : पियाजो ॲपे या तीनचाकी वाहनास आग लावल्याची घटना पंचवटीतील वाघाडी परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश एस. वर्मा (२४, रा. संजयनगर, वाघाडी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने मंगळवारी (दि.२३) मध्यरात्री वाहनास आग लावून २० हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
नाशिक : लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादातून जमावाने एकास मारहाण केल्याची घटना वडाळा नाका येथील रेणुकानगर परिसरात घडली. एजाज खलील शेख (४६) यांच्या फिर्यादीनुसार संशयित अरफात खान, अरबाज गाझी यांच्यासह इतर तिघांनी मिळून कुरापत काढून सोमवारी (दि.२२) सायंकाळी ४.३० वाजता मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेली ३ लाख रुपयांची रोकड नोकराने लंपास केल्याची घटना त्र्यंबक नाका सिग्नल येथे घडली. गणपत सुकदेव हाडपे (५३), रा. सहदेवनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित प्रशांत गवळी (रा. गंगापूर रोड) याने मंगळवारी (दि.२३) सायंकाळी सहाच्या सुमारास वाहनातून रोकड लंपास केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : जय भवानी रोडवरील फर्नांडिसवाडी येथे जमावाने संजय चमन बेद (३७, रा. फर्नांडिसवाडी) यांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.२१) रात्री ८.३० वाजता घडली. याप्रकरणी संजय यांच्या फिर्यादीनुसार, उपनगर पोलिस ठाण्यात संशयित आदर्श मेहरोलिया, प्रेम ठेणवाल, रुपेश, अमन साळवे, गोलू उज्जेनवाल याच्यासह इतर तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.