Jalgoan : अयोध्या सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे शहरात आकर्षक सजावटीसह रोषणाई | पुढारी

Jalgoan : अयोध्या सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे शहरात आकर्षक सजावटीसह रोषणाई

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रतिमांसह आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शहरातील लालबहाद्दुर शास्त्री टॉवर, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावटीसह रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वत्र प्रकाशपर्वाची अनुभूती होत आहे. सोहळ्यानिमित्ताने जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या १३ हजारहून अधिक सहकाऱ्यांना पेढे वाटप करण्यात येणार आहेत.

लालबहाद्दूर शास्त्री टॉवरवर ८० फूटांची प्रभू श्रीरामांची प्रतिमा
सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य अशी ८० फूट उंचीची प्रतिमा जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या लालबहाद्दुर शास्त्री टॉवरवर साकारण्यात आली असून ही भारतातील सर्वात मोठी प्रतिमा असणार आहे. तसेच स्वातंत्र्य चौकात ३० फूट तर आकाशवाणी चौकात ४० फूटांची प्रतिमा देखील उभारण्यात आली आहे. या प्रतिमेतून प्रभू श्रीरामाचे विराट दर्शन होत असल्याने संपूर्ण शहर राममय झालेले पहावयास मिळत आहे.

५१ मंदिरांमध्ये प्रसाद वाटप
राम मंदिर प्राणप्रतिष्ठादिनी जैन इरिगेशनतर्फे शहरातील जवळपास ५१ मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना केळी प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी शिवराज्याभिषेक लोकोत्सव समिती महाबळ उपनगर यांचे सहकार्य लाभणार आहे.

दर्शन प्रभू श्रीरामांच्या विचारांचे…
काव्यरत्नावली चौकामध्ये सण-उत्सव व महापुरूषांच्या जयंतीदिनी विशेष सजावट केली जाते. त्यानुसार सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामाची १६ फूट प्रतिमेसोबतच पाच फुटी चार दिवे व विद्युत रोषणाई राहणार आहे. “दर्शन.. वत्सलतेचे, मातृ-पितृ भक्तीचे! दर्शन.. त्याग, सत्यवचन, संस्कृतीचे! आदर्श संस्कार मर्यादेचे, पुरूषोत्तमांच्या सहिष्णुतेचे!” या संकल्पनेवर आधारित विशेष सजावट करून श्रीरामांचा आदर्श आचरणी आणण्याचा संदेश दिला जाणार आहे. ही सजावट जैन इरिगेशनच्या कलाविभागातील सहकारी जगदीश चावला व सहकाऱ्यांनी साकारली आहे.

स्नेहाच्या शिदोरीत ड्रायफूटचा शिरा
कांताई सभागृह येथे वाटप होणाऱ्या ‘स्नेहाच्या शिदोरी’सोबत ड्रायफूट शिरा प्रसाद म्हणून दिला जाणार आहे.

अशोक जैन
प.पु. श्री गुरूमाऊली व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचे अयोध्येत स्वागत करण्यात आले.

अशोक जैन यांची अयोध्येला उपस्थिती
श्रीराम मंदीर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सात अधिवासांमध्ये होत आहे. या सोहळ्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे देखील निमंत्रीत असल्याने ते अयोध्याला आले असून श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ५० लाख भाविकांचे प्रतिनिधित्व ते करणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button