राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विशेष स्वच्छता मोहिम | पुढारी

राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विशेष स्वच्छता मोहिम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार नाशिक महापालिकेने मंगळवार(दि.१६)पासून प्रभाग क्रमांक १३ व १४ मधून शहरात स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. दरम्यान, गोदाघाटाची स्वच्छता केली जात असून पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत या कामाची पाहणी केली.

अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची रविवारी अडीच तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे राम मंदिरातराम लल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश स्वच्छ करण्याबरोबर प्रत्येक मंदिराची धुवून, झाडून पुसून साफसफाई करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नाशिकच्या काळाराम मंदिर येथे पंतप्रधानांनी स्वतः स्वच्छता करून या मोहिमेचा शुभारंभ केला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापासून स्वच्छतेचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व विभागांची बैठकीत संपूर्ण शहराची स्वच्छता करण्यासाठी ३१ प्रभागांमध्ये स्वच्छता नियोजनाच्या कृती आराखडा तयार केला. शहरातील ३१ प्रभागात असलेली सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, दुभाजक, नदीपात्र, नदी किनारे, बाजारपेठा व्यावसायिक ठिकाने, सार्वजनिक व सुलभ सौचालय मनपाची सर्व उद्याने, मोकळे भूखंड, धार्मिक स्थळ परिसर, गोदा घाट, सर्व पूल या ठिकाणी ही स्वच्छता केली जाणार आहे. मंगळवारी प्रभाग १३ व १४ मधून या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला गेला. प्रभाग १३ मधील जिल्हा परिषद कार्यालय समोरील परिसर, प्रभाग १४ मधील अमरधाम परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

गोदापात्रातील पानवेली काढण्याचे आदेश

स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी गोदाघाट स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी गोदापात्रातील पानवेली तातडीने हटविण्याचे आदेश त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. रामवाडी पुल ते अहिल्यादेवी होळकर पुला दरम्यान नदीपात्रातील पानवेली ट्रॅश स्किमरने काढण्याचे काम सुरू आहे. त्याची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, माजी सभापती बळीराम ठाकरे, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button