Narendra Modi Nashik Visit : पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार

Narendra Modi Nashik Visit : पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.१२) नाशिक दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असून, त्यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदाआरतीही होणार आहे. या कार्यक्रमांना पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोड शो नंतर मोदी थेट काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर ते उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी जातील, असे महाजन यांनी सांगितले. (Narendra Modi Nashik Visit)

मोदींच्या दौऱ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये तळ ठोकून असलेले मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 'एसपीजी'चे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्याकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. प्रथम मोदींचा 'रोड शो' आणि नंतर महोत्सवाचे उद‌्घाटनाचे नियोजन होते. त्यानंतर मोदींनी काळाराम मंदिराच्या दर्शनाला यावे, अशी मागणी पुजाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्याला आता पंतप्रधान कार्यालयानेही दुजोरा दिला असल्याचे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट कामानिमित्त झाल्याचे सांगत, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही महाजन यांनी टीका केली. खा. राऊत आणि ठाकरे यांनी बालिश विधाने थांबवावित, असा टोलाही त्यांनी लगावला. पानेवाडी येथील टँकरचालकांमधील काही चालक मुद्दाम आंदोलन करून गाड्या अडवत असल्याचा आरोपही महाजन यांनी केला. अधिकृत संघटनांचे समाधान झाले आहे. त्यामुळे टँकर बंद होणार नाहीत, याबाबतची काळजी घेतली जाईल असे आश्वासनही महाजन यांनी दिले. (Narendra Modi Nashik Visit)

ठाकरे गटाला एकही जागा नाही

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रातील सर्वच ४८ जागांवर विजय मिळेल. ठाकरे गटाला एकही जागेवर विजय मिळविता येणार नाही, असा दावाही महाजन यांनी केला. नरेंद्र मोदी म्हणजे विकासाची गॅरंटी. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. राहुल गांधी हे देशाला महासत्ता बनवू शकत नाहीत, अशी टीकाही महाजन यांनी केली.

शाळांना सुट्टी नाही

मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा होती. महाविद्यालयीन विद्यार्थी येणार असल्यामुळे महाविद्यालय आणि शाळा बंद ठेवण्याची मागणी केली जात होती. परंतु, महाजन यांनी शाळा-महाविद्यालयांना कोणत्याही परिस्थितीत सुट्टी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news