

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (दि.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान दौऱ्यानिमित्त पोलिस आयुक्तालयाने बंदोबस्ताची तयारी केली असून, सूक्ष्म नियोजनासह प्रत्येक विभागास जबाबदारीचे वाटप केले जात आहे. तसेच केंद्रीय सुरक्षा पथकाकडून बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे.
स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय विभाग, राज्य गुप्तवार्ता, दहशतवादविरोधी पथक यासह सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, नाशिक शहर व जिल्ह्यासह परिक्षेत्रातील काही जिल्ह्यांतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलने होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरही कांदा उत्पादकांनी पंतप्रधान दौऱ्यानिमित्त आंदोलनाची मते मांडली आहेत. त्यामुळे अशा पोस्टवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करीत गोपनीय माहिती संकलित करीत आहेत. पोलिस यंत्रणेने आंदोलकांवर करडी नजर ठेवली आहे. पंतप्रधान दौऱ्यानिमित्त राज्य विशेष सुरक्षा विभाग, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या राज्य प्रमुखांमार्फतही सुरक्षेचा सतत आढावा घेण्यात येत आहे.
असा असेल दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११.३०च्या सुमारास ओझर विमानतळावर दाखल होतील. तेथून तपोवनात तयार केलेल्या हेलिपॅडवर ते उतरतील. तेथून १२ च्या सुमारास रोड शो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर राष्ट्रीय युवक महोत्सवाचे पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील. दुपारी २ च्या सुमारास ते मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिस व संबंधित यंत्रणांतर्फे सुरक्षेसह दौऱ्याचे अंतिम नियोजन सुरू आहे.
केंद्रीय पथक शहरात दाखल
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले केंद्रीय पथक शहरात दाखल झाले आहे. १३ अधिकारी शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातून १,९०० पोलिस कर्मचारी व सुमारे १०० पोलिस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असून, त्यांची नेमणूकही केली जाणार आहे.
आंदोलनकर्त्यांची समजूत काढू
आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधून त्यांची समजूत काढू. त्यांचे म्हणणे प्रशासनापर्यंत मांडण्याचे प्रयत्न करू. आंदोलनकर्ते आमचे म्हणणे ऐकतील, अशी आशा आहे. तसेच खबरदारी म्हणून आवश्यकता भासल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करू. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त
हेही वाचा :