Nashik Youth Festival : युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक | पुढारी

Nashik Youth Festival : युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिकेकडून शहर-परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणांहून ११ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. (Nashik Youth Festival)

शहरामध्ये १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद‌्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. चारदिवसीय महोत्सवात देशभरातून ८ हजार युवक महोत्सवात सहभागी होतील. शहरातील सात विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात नाशिकला स्वत:चे ब्रॅण्डिंग करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून जय्यत तयारी केली जात आहे. (Nashik Youth Festival)

महापालिकेतर्फे शहरभरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यादृष्टीने मनपाचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी नुकतीच सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, मोकळे भूखंड, क्रीडांगणे, नाले व नदीकिनारे इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. २६ जानेवारीपर्यंत दररोज ही मोहीम राबवावी. तसेच या कामी स्वयंसेवी संस्था व एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यानुसार मागील दोन दिवसांमध्ये स्वच्छता मोहिमेवेळी सुमारे ११ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची माेहीम राबविली जात असून, सर्व विभागीय अधिकारी हे नोडल अधिकारी असतील. (Nashik Youth Festival)

वाहतूक बेट, दुभाजकांची सफाई

स्वच्छता मोहिमेअंतर्गत पंचवटी, नाशिकराेड, सातपूर, नाशिक पूर्व व पश्चिम तसेच सिडको अशा सहाही विभागांत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणांसोबत सहाही विभागांतील वाहतूक बेट, रस्त्यांमधील दुभाजक व फुटपाथची स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा ;

Back to top button