एकनाथ खडसे यांनी घेतले अक्षता कलशाचे दर्शन | पुढारी

एकनाथ खडसे यांनी घेतले अक्षता कलशाचे दर्शन

जळगाव, पुढारी वृत्तसेवा: मुक्ताईनगरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या आलेल्या अभिमंत्रित अक्षता वाटपासाठी आज (दि.६) सकाळी नऊ वाजता नागेश्वर मंदिर जुने गाव येथून अक्षत कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून अक्षता कलश व प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन  केले. खडसे यांनी दर्शनासाठी दिलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे.

कोणत्याही मोठ्या नेत्याने अक्षता कलश यात्रेत हजेरी लावली नसताना खडसे यानी थेट आपल्या तत्कालीन सहकार्‍यांसोबत आठवणींना उजाळा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावेळी माझ्यासह कारसेवक मधू चव्हाण, भिसन चव्हाण,पंडित पालवे,राजू खेवलकर,राजू कपले,सतीश चौधरी,सुनील श्रीखंडे, डी एस चव्हाण देखील उपस्थित होते.

आमदार खडसे यांनी भाजपला राम राम केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. २२ जानेवारीरोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे. देशातील प्रत्येक गाव व शहरातून अक्षता कलश यात्रा काढण्यात येत आहेत. अशाप्रकारे मुक्ताईनगरातून देखील आज भव्य कलश यात्रा काढण्यात आली. नागेश्वर मंदिर जुने गाव येथून अक्षत कलश यात्रा काढण्यात आली होती.

प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,बजरंग दल,विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांसह  कलशधारी महिला,शाळेचे विद्यार्थी आदींसह असंख्य  हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते. 1990 व 1992 वेळी झालेल्या कार सेवेच्या वेळेचे कारसेवक उपस्थित होते. यावेळी कार सेवेच्या प्रसंगाची आठवण करून ललित पुर येथे झालेली अटक आणि लाठी चार्ज झाल्याची आठवण उपस्थितांनी करून दिली.

खडसे हे कारसेवक म्हणून राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांना उत्तरप्रदेशातील ललीतपूर येथील कारागृहात दाखल करण्यात आले होते. आज श्रीराम अक्षता कलशाचे दर्शन घेताना त्यांनी या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी त्यांनी डोक्यावर घातलेली भगवी गांधी टोपी देखील उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. याचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा

Back to top button