नाशिक : सप्तश्रृंगीनगरजवळ एसटी झाडावर आदळल्याने अपघात; १६ जण जखमी | पुढारी

नाशिक : सप्तश्रृंगीनगरजवळ एसटी झाडावर आदळल्याने अपघात; १६ जण जखमी

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा शहरानजीक असलेल्या सप्तश्रृंगीनगर जवळ एसटी बसचा अपघात झाला. कळवण-मालेगाव (एमएच०७ सी ९१०८) या बसचा गुरुवारी (दि. ४)  रात्री साडे सात वाजताच्या सुमारास झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये चालक-वाहकासह बसमधील जवळपास १६ प्रवाशी जखमी झाल्याने त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार बस चा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाला. यात टायर फुटल्यामुळे बस झाडावर आदळली. जखमींना पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी संदर्भित करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळवण आगाराची कळवण-मालेगाव बस गुरुवार (दि ४) रोजी देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वी सप्तश्रृंगीनगराजवळ वेगाने येत असताना पहिल्यांदा उजव्या साईडच्या विजेच्या खांबाला धडक देत व त्यांनतर डाव्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर धडकली. रात्री साडे सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बसची पुढची डावी बाजू पूर्ण चेपली गेली असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळेस या बसच्या मागेपुढे कोणतेही वाहन नसल्याने पुढील अनर्थ टळला. .

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :

राहुल राजू कचवे (वय ३०) चांदवड, वाय एस महाले वाहक( वय ३०) सुरगाणा, अकबर अली शहा (५०) मालेगाव, भिका रुपसिंग सोळंके (७५) नवेगाव, अरविंद गणपतराव जोंधळे( ६५) कोल्हापूर, पांडुरंग शंकर साठे( ६४) गडहिंग्लज, पुरुषोत्तम देवबा ठाकरे चालक (४६) कळवण, हर्षल युवराज पगार (२०) खुंटेवाडी, कोमल विकास शिरसाठ (२०) देवळा, मोहम्मद मनु( २५) मुझफ्फरनगर, सविता भावराव सूर्यवंशी( ४३) देवळा, ओंकार बाबासाहेब येरुळे (२०) राहुरी, मेहेरदिन अब्दुल गफर (३४) मुझफ्फरनगर, आकाश कृष्णा गांगुर्डे (२४) देवळा, लखन हरी सोनवणे (४०) कळवण, योगिता लखन सोनवणे (३५) कळवण, उषाबाई पोपट थोरात (४८) पिंपळगाव वा.यांचेवर
प्राथमिक उपचार करण्यात आले . यातील गंभीर जखमींना कळवण, मालेगाव, नाशिक, चांदवड या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. जखमींना बसमधून बाहेर काढत दवाखान्यात नेण्यासाठी संभाजी आहेर मित्रमंडळ, शिवराजे मित्र मंडळ, कळवण रोड यांच्यासह इतरांनीही तातडीची मदत करण्याचे सहकार्य केले.

याशिवाय येथील देवळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचीही मोलाची मदत मिळाली. यावेळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, ज्योती गोसावी, आगारप्रमुख संदीप बेलदार, राजेंद्र आहिरे उपस्थित होते. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Back to top button