Nashik News : नव्या कायद्याविरोधात इंधन वाहतूकदारांचा आजपासून बंद | पुढारी

Nashik News : नव्या कायद्याविरोधात इंधन वाहतूकदारांचा आजपासून बंद

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारने वाहनचालकांसाठी केलेल्या नवीन कायद्याला मालट्रक, टँकरसह सर्वच वाहनचालकांनी विरोध दर्शविला आहे. मनमाडजवळील पानेवाडी, नागापूर परिसरात असलेल्या इंधन कंपन्यांमधून राज्यभरात धावणाऱ्या सुमारे दोन हजारांहून अधिक टँकर आणि ट्रकचालकांनी साेमवार (दि. 1) पासून कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. चालक संघटनेच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

केंद्र सरकारने नुकताच भारतीय न्याय संहिता २०२३ कायदा लागू केला आहे. त्यात अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास १० वर्षे कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे. हा कायदा अतिकठोर आणि अन्यायकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करत वाहनचालकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातून येथील इंधन कंपन्यांमधून राज्यभरात धावणाऱ्या दोन हजारांहून अधिक टँकर, ट्रकचालकांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. टँकर, ट्रक चालक संघटनेच्या बैठकीत कायद्यावर चर्चा झाली. कोणताही चालक जाणूनबुजून अपघात करत नाही. अपघाताची वेगवेगळी कारणे असतात. अपघातात नागरिकांचाच नाही, तर चालक आणि क्लीनरचादेखील मृत्यू होतो. मात्र अपघातास चालकालाच जबाबदार धरून जमाव त्याच्यावर तुटून पडतो. प्रसंगी बेदम मारहाण तसेच वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडतात. जमावापासून स्वत:ला वाचविण्यासाठी काही चालक घटनास्थळापासून पळ काढतात. अशा परिस्थितीत नवीन कायद्यानुसार होणारी शिक्षा आणि दंड हा अन्यायकारक ठरतो, असा सूर बैठकीत उमटला.

इंधनटंचाईची शक्यता

मनमाडपासून ४ ते ७ किमी अंतरावर नागापूर, पानेवाडी, धोटाणे भागात इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीचे पेट्रोल, डीझेल आणि गॅस सिलिंडरचे प्रकल्प आहेत. त्यातून राज्यभरातील वेगवेगळ्या भागांत सुमारे दोन हजारांहून अधिक टँकर आणि ट्रकच्या माध्यमातून इंधनपुरवठा होतो. हे सर्व चालक संपात सहभागी होणार असल्यामुळे इंधनपुरवठा विस्कळीत होणार आहे. परिणामी, इंधनटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी चालकांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button