Nashik News : सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार ‘दीपस्तंभ’ला प्रदान | पुढारी

Nashik News : सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार 'दीपस्तंभ'ला प्रदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्कृष्ट मांडणी, उत्तम लेख यांचा संगम असलेल्या दैनिक ‘पुढारी’च्या दीपस्तंभ या दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक लीना बनसोड, जिल्हा ग्रंथ संघाचे उपाध्यक्ष वसंत खैरनार आणि पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी लीना बनसोड यांनी, वाचन संस्कृती वाढवायची असेल, ती टिकवायची असेल तर आपण प्रत्येकाने पुस्तके वाचली पाहिजेत. पुढच्या पिढीवर वाचन संस्कार केले पाहिजे. येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मोठे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. हे आव्हान पेलायचे असेल तर आपल्याला वाचनाने समृद्ध व्हावे लागेल, असे त्या म्हणाल्या.

बनसोड पुढे म्हणाल्या, वयाच्या ७४ व्या वर्षीही भीमाबाई जोंधळे वाचन चळवळ वाढविण्यासाठी घेत असलेले परिश्रम तरुणांना लाजवतील असे आहेत. त्यांनी हॉटेलमध्ये वाचनालय सुरू करून वाचन चळवळ वाढविण्यासाठी हातभार लावण्याबरोबरच पुस्तकांच्या माध्यमातून अनेकांच्या हृदयात घर केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत खैरनार म्हणाले, भीमाबाई यांनी पुस्तकांची आई म्हणून अनेकांच्या हृदयात पुस्तकांबरोबरच आपलेही स्थान निर्माण केले आहे. पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारे समाधान मोठे आहे. ते पैशाने विकत घेता येणार नाही. माणसाला विचार श्रीमंती प्रदान करण्याचे काम पुस्तके करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकांना महत्त्वाचे आणि मोठे स्थान असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याणी बागडे यांनी केले. सप्तर्षी माळी यांनी आभार मानले. दरम्यान, येथील दहावा मैल येथील आजीचं पुस्तकांचं हॉटेल आणि अक्षरबंध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोमवारी (दि. २५) पुस्तक महोत्सव आणि वाचन कट्ट्याची सुरुवात करण्यात आली.

‘अक्षरबाग’, ‘अमृतवेल’, ‘मृदगंध’ची सुरुवात

कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतीच्या नावे ‘अक्षरबाग’ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते ‘मृदगंध’ वाचन कट्ट्याची सुरुवात करण्यात आली. विंदा करंदीकर यांच्या साहित्यकृतीच्या नावे हा कट्टा सुरू करण्यात आला. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही वाचनप्रेमी व्यक्तीने या कट्ट्यावर येऊन पुस्तके वाचावीत यासाठी हा कट्टा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर वि. स. खांडेकर यांच्या ‘अमृतवेल’ या साहत्यिकृतीच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या पुस्तक दालनात नव्या-जुन्या पुस्तकांचा महोत्सव सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button