राज ठाकरे व्हीव्हीआयपी, उद्धव तर फक्त पहिल्या टर्मचे आमदार, अयोध्या सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजपची तिरंदाजी | पुढारी

राज ठाकरे व्हीव्हीआयपी, उद्धव तर फक्त पहिल्या टर्मचे आमदार, अयोध्या सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजपची तिरंदाजी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram temple) भव्य उद्घाटन सोहळ्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना व्हीआयपी म्हणून निमंत्रण देताना भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाकारतानाच त्यांचा जाहीर पाणउतारा केला.

उद्धव ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. आपण व्हीव्हीआयपी आहोत, असे त्यांना वाटत असले तरी केंद्राच्या यादीत त्यांचे नाव नसेल, असा टोला भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.

सध्या अयोध्येत श्रीराम मंदिराच्या (Ram Mandir Inauguration) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. प्रमुख राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना 22 जानेवारीच्या या सोहळ्याची खास निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. देशभरातील आठ-साडेआठ हजार अतिमहत्त्वाच्या म्हणजेच व्हीव्हीआयपी मंडळींना निमंत्रण, पासेस गेले आहेत. त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही, हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असेही महाजन म्हणाले.

अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे? घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही 20-20 दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत कोणतेच दुमत नाही. मात्र, आता जे बोलत आहेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हानच गिरीश महाजन यांनी दिले. राम मंदिरासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु, राम मंदिरासाठी भरपूर लोकांनी एक कोटी रुपये दिले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ज्यांना लालकृष्ण अडवाणी यांची आठवण होत नाही, विश्वहिंदू परिषदेचा उल्लेख होत नाही अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार, असा टोला ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी भाजपला लगावला. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण येवो अथवा न येवो, राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. आज इव्हेंट करणार्‍या लोकांनी जेव्हा बाबरी मस्जिद पडली तेव्हा पळपुटेपणा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हा तिढा सुटला आहे, याकडे सचिन अहिर यांनी लक्ष वेधले.

Back to top button