Sudhakar Badgujar : बडगुजर यांचे तीस वर्षांतील आर्थिक व्यवहार रडारवर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात भ्रष्टाचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि. २२) बडगुजर यांची चाैकशी होणार आहे. दरम्यान, या गुन्ह्यासंदर्भात बडगुजर ॲण्ड बडगुजर या कंपनीच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९२ सालापासूनचे आर्थिक व्यवहार विभाग तपासत आहे. त्यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांसह महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बडगुजर यांचा पाय अधिक खोलात गेला आहे. नगरसेवक असतानाही बडगुजर यांनी त्यांच्या कंपनीस मनपाची कामे मिळवून दिल्याची तक्रार तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २०१६ मध्ये केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झाला आहे.
गेडाम यांच्या तक्रारीची विभागाने खुली चौकशी सुरू केली. चौकशीत सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या स्वत:च्या मे. बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीतून डिसेंबर २०१६ मध्ये निवृत्ती घेतल्याची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ती महापालिकेत सादर केल्याची बाब समोर आली. तसेच त्यांनी नगरसेवक व इतर पदे भूषवत पदांचा वापर करून त्यांच्या बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीस महापालिकेकडून विविध विकासकामांचे ठेके मिळवून दिले. २००६ ते २००९ या कालावधीत त्यांनी त्यांच्या कंपनीस ३३ लाख ६९ हजार ४३९ रुपयांचे ठेके मिळवून देत स्वत:चा आर्थिक फायदा करीत महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे. तसेच कंपनीच्या बँक खात्यातून बडगुजर यांनी स्वत:च्या बँक खात्यात लाखाे रुपये घेतल्याची बाबही उघड झाली आहे. त्यामुळे रविवारी (दि. १७) सरकारवाडा पोलिस ठाण्यात बडगुजर यांच्यासह साहेबराव रामदास शिंदे व सुरेश भिका चव्हाण यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यासह फसवणूक, दस्तऐवजांचे बनावटीकरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यासंदर्भात बडगुजर यांची शुक्रवारी चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी बडगुजर यांनी स्वत: वेळ मागून घेतल्याने ते कोणती कागदपत्रे विभागास सादर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र विभागाने बडगुजर यांच्या घर व कार्यालयाच्या झडतीतून गुन्ह्याशी संदर्भात महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे विभागाने बडगुजर यांची चौकशी सुरू केली आहे.
दुसऱ्या शहरातही ठेके
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीने दुसऱ्या शहरातील महापालिकांचेही ठेके घेतल्याचे उघड होत आहे. कंपनीच्या बँक खात्यातून स्वत:च्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्यासाठी शेकडो व्यवहार केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे बडगुजर यांनी कंपनीतून निवृत्ती घेतली, तरी कंपनीच्या बँक खात्यातून पैसे का घेतले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर पुरावे शोधण्याचे प्रयत्न
सलीम कुत्तासोबतच्या पार्टी प्रकरणात गुन्हे शाखेकडून गुरुवारी इतर साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवण्यात आले. तसेच इतर पुरावे शोधण्यासाठी गुन्हे शाखेने प्रयत्न केले. त्यामुळे बडगुजर यांची चौकशी झाली नसल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितले.
हेही वाचा :