नाशिकच्या वेशीवर लाल वादळाचा विसावा, २०० किलोमीटरचे अंतर पार

नाशिकच्या वेशीवर लाल वादळाचा विसावा, २०० किलोमीटरचे अंतर पार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आदिवासी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीन व जंगल हक्क; शेतमालाला रास्त भाव, दुष्काळग्रस्तांच्या समस्या, भूसंपादन तसेच गायरान हक्कासाठी नंदुरबार येथून निघालेला बिऱ्हाड माेर्चा रविवारी (दि. १७) नाशिकच्या वेशीवर विसावला. नागपूर येथे सरकारशी चर्चेसाठी गेलेल्या माेर्चाच्या शिष्टमंडळाची सायंकाळपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आडगाव ट्रक टर्मिनसच्या परिसरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिसरात सर्वत्र लाल बावटाच दृष्टीस पडत होता.

आदिवासी बांधवांच्या विविध न्याय्य हक्क मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथून दि. ७ डिसेंबरला बिऱ्हाड माेर्चाने प्रयाण केले. चांदवडमार्गे जिल्ह्यात प्रवेश केलेला हा माेर्चा आडगावच्या ट्रक टर्मिनसपर्यंत पोहोचला. खांद्यावर लाल बावटा घेतलेले हे मोर्चेकरी मजल-दरमजल करून नाशिकच्या वेशीवर पोहोचले. मोर्चामध्ये हजारो महिला व पुरुष सहभागी झाले आहेत. दरम्यान, शासनाने शनिवारी (दि. १६) मोर्चेकऱ्यांमधील नेत्यांशी संपर्क साधत त्यांना नागपूर येथे चर्चेकरिता बोलावले. मात्र, हे शिष्टमंडळ रविवारी (दि. १७) सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाले नव्हते. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी आडगाव येथेचे रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.

बिऱ्हाड मोर्चाचे नेतृत्व रामसिंग गावित, करणसिंग कोकणी, किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते, रणजित गावित, दिलीप गावित, आर. टी. गावित, यशवंत माळचे, होमाबाई गावित, शीतल गावित, लीलाबाई वळवी, विक्रम गावित, शांताबाई गावित यांच्यासह अन्य पदाधिकारी करत आहेत.

२०० किलोमीटरचे अंतर पार

नंदुरबार ते मुंबईतील मंत्रालय असा हा पायी मोर्चा काढण्यात आला आहे. दि. ७ डिसेंबरपासून प्रारंभ झालेला हा माेर्चा नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव, चांदवडमार्गे सुमारे २०० किलोमीटरचे अंतर पार करत नाशिकच्या वेशीवर पाेहोचला आहे. मोर्चामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजाराे आदिवासी शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य करण्यासाठी नंदुरबार ते मुंबई व्हाया नाशिक असा साधारण ४३२ किलोमीटरचे अंतर पार करण्याचे ध्येय ठेवून हा मोर्चा मार्गस्थ झाला.

पाेलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बिऱ्हाड मोर्चा ठरल्यानुसार नाशिक शहरातून मार्गक्रमण करत पुढे मुंबई-आग्रा महामार्गावरून विल्होळी परिसरात मुक्कामी जाणार होता. त्यामुळे नाशिककरांची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळी 7 पासून शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. पण, दिवसभर मोर्चेकरी न फिरकल्याने अखेर पोलिसांनी बंदोबस्त शिथिल केला. दरम्यान, आडगाव ट्रक टर्मिनस येथे पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध असल्याने मोर्चेकरी बांधवांची गैरसोय काहीशी टळली.

प्रमुख मागण्या

-नवापूर, नंदुरबार, साक्री, धुळे, कन्नड, सटाणा, मालेगाव, शिरपूर तालुके दुष्काळी जाहीर करावे.

-नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरी 30 हजार रुपये भरपाई द्यावी.

-साक्री तालुक्यातील २०१८ ची १३ हजार ६०० रुपयांची भरपाई तातडीने द्यावी.

-आदिवासी व इतर जंगल निवासी वनहक्क कायदा २००६ ची अंमलबजावणी करावी.

-दावेदारांना हक्कांचे सातबारा द्यावे.

-आदिवासीविरोधी वनकायदा २०२३ रद्द करावा.

-कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी.

-सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्त करावे.

-मणिपूरमध्ये आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी.

-बोगस आदिवासी हटवा, आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवा.

-लखीमपूर-खिरी (यूपी) येथे पाच शेतकऱ्यांना ठार मारणाऱ्या मंत्र्याच्या मुलावर कारवाई करावी.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news