EV Sales : ‘ईव्ही’ विक्रीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी, वर्षभरातच विजेच्या मागणीत तीनपट वाढ | पुढारी

EV Sales : 'ईव्ही' विक्रीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी, वर्षभरातच विजेच्या मागणीत तीनपट वाढ

नाशिक : सतीश डोंगरे

वाहन क्षेत्रात झपाट्याने बदल घडवून आणणाऱ्या ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या विक्रीत (EV Sales)  महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळवले असून, पहिल्या स्थानी उत्तर प्रदेश आहे. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात पाच लाख २९ हजार ६८० वाहनांची विक्री झाली असून, पाठाेपाठ महाराष्ट्रात तीन लाख २० हजार १८९ इतकी वाहने विकली गेली. वाढत्या वाहन विक्रीमुळे अवघ्या वर्षभरात तीनपट म्हणजे १४.४४ दशलक्ष युनिट विजेची मागणीही वाढली आहे.

पेट्रोल, डिझेलला पर्याय ठरत असलेल्या ‘ईव्ही’ला अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशभरात २०१७ ते १२ डिसेंबर २०२३ पर्यंत २१ लाख ८२ हजार ८२७ वाहनांची विक्री झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीचा विचार केल्यास, २०२१ मध्ये महाराष्ट्रात २९ हजार ९०७ ईव्हीची विक्री झाली. कोरोना महामारीचे सावट कम, हा आकडा तीनपटीने वाढला. २०२२ मध्ये तब्बल एक लाख ३६ हजार ३५ इतकी ईव्ही विक्री झाली. चालू वर्षातही हा ट्रेंड कायम होता. चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यांत राज्यात ९३ हजार ६५६ ईव्हीची विक्री झाली. तर पुढच्या चार महिन्यांत ६० हजार ५९१ ईव्हीची विक्री झाली. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रिक रिक्षा, बसेस अशा सर्वच प्रकारांतील वाहनांची ही आकडेवारी असून, ईव्हीच्या वाढत्या विक्रीमुळे वर्षभरातच विजेची मागणी तीनपट वाढली आहे. (EV Sales)

दरम्यान, इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात नवे स्टार्टअप येत असल्याने, सध्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे. ईव्ही वाहनांच्या वाढत्या किमती हा ग्राहकांसमोरील चिंतेचा विषय असला तरी, वाढत्या स्पर्धेमुळे वाहनांच्या किमती कमी होण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच ईव्हीचा वापर वाढावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा विचार केल्यास, पुढील काळात ईव्हीच्या विक्रीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील ईव्ही विक्री अशी (EV Sales)

दुचाकी – २,७२,५०२

तीनचाकी – १९,२८८

चारचाकी – २६,६२९

बस – १,४५९

अशी वाढली विजेची मागणी

गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘ईव्ही’साठी विजेची मागणी ४.५६ दशलक्ष युनिट इतकी होती. मार्च २०२३ पर्यंत यात वाढ होऊन ती ६.१० दशलक्ष युनिट इतकी झाली. तर जुलै २०२३ पर्यंत १४.४४ दशलक्ष युनिट म्हणजेच अवघ्या 10 महिन्यांत तीनपट मागणी वाढली आहे. ईव्हीसाठी विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.

कंपन्यांवर धनवर्षाव

ईव्ही विक्रीतून कंपन्या मालामाल होत असल्याचे दिसून येत आहे. देशभरात गेल्या काही वर्षात ईव्ही विक्रीतून तब्बल ३,६१८.०६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या क्षेत्रात नव्या कंपन्यांची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. काही विदेशी कंपन्यांनीदेखील भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पुढील काळात देशात ईव्हीत होणारी उलाढाल ही मोठ्या प्रमाणात असणार आहे.

हेही वाचा :

Back to top button