Nashik Crime : वाहनचालकांना गंडा घालून वाहनांची परस्पर विक्री करणारा गजाआड | पुढारी

Nashik Crime : वाहनचालकांना गंडा घालून वाहनांची परस्पर विक्री करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वाहनचालकांना गंडा घालून त्यांच्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या संशयिताला भद्रकाली पोलिसांनी अटक केली. या संशयिताने तीन वाहनांची विक्री केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी ती वाहने जप्त केली आहेत.

शादाब अब्दुल रहीम शेख (३४, रा. सारडा सर्कल, सध्या रा. वाशी नाका, चेंबूर, मुंबई) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने २३ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री भद्रकाली परिसरातून मुंबईला जाण्यासाठी (एमएच ५ एएक्स ६५७७) क्रमांकाची कार भाडेतत्त्वावर घेतली होती. मात्र त्याने ती मालकाला कार परत न करता अपहार केला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास भद्रकाली पोलिस करीत होते. दरम्यान, संशयित शेख हा तळोजा मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी अहिरे व अंमलदार सुरज पगारे यांनी संशयितास ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने कारची अकोला येथे परस्पर विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारचा ताबा घेतला. सखोल चौकशीत शेखने कार (क्रमांक एमएच १५ बीएन ७३३१) आणि आणखी एक कारची नाशिकमधील भगूर व मुंबई येथे विक्री केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही कारही जप्त केल्या आहेत. संशयित शेखकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अहिरे, उपनिरीक्षक राम शिंदे, दीपक पटारे, अंमलदार पगारे, किरण निकम संदीप शेळके, सागर निकुंभ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दुसऱ्या टोळीतील संशयितही गजाआड

हाजी चिरागोद्दिन काजी शेख (रा. काजीपुरा) यांनी त्यांच्याकडील तीन वाहने विक्रीसाठी खालिद हनिफ शाह (रा. जळगाव), अमोल बापू चव्हाण (रा. छत्रपती संभाजीनगर), अमोल वालचंद बिंबे (रा. बुलढाणा) व जळगावमधील श्रीराम सिटी युनियन फायनान्सचे विभागीय अधिकारी विवेक उल्हास पाटील (रा. जळगाव) यांच्याकडे दिली होती. मात्र संशयितांनी संगनमत करून वाहनांची परस्पर विक्री केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जुलै महिन्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अमोल बिंबे यास पकडले असून त्याच्याकडून, टेम्पो ट्रॅव्हलर जप्त केला आहे.

हेही वाचा :

Back to top button