Dhule Crime : बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना अटक | पुढारी

Dhule Crime : बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा– बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अशाप्रकारे बनावट कागदपत्र तयार करून मालमत्तेची विल्हेवाट लावणारी मोठी टोळी धुळे शहरात कार्यरत असल्याचा संशय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केला असून संबंधितांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

राजस्थान मधील चितोडगड जिल्ह्यात राहणाऱ्या जेबुन्निसा मोहम्मद शफी यांनी देवपूर परिसरामध्ये दोन प्लॉट 1987- 1988 मध्ये नोंदणीकृत खरेदी खताद्वारे खरेदी केले होते. हे प्लॉट त्यांच्याच नावावर होते. त्यामुळे त्यांचा मुलगा धुळ्यात आला असता त्यांनी या दोन्ही प्लॉटची पाहणी केली. तसेच कागदपत्रांची तपासणी केली असता या प्लॉटची बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी विक्री झाल्याची बाब त्याच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्याने पोलिसांकडे तक्रार केली. या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी चौकशी केली असता यात बनावट कागदपत्रांच्या आधारे या दोनही मालमत्तेची विल्लेवाट लावली गेल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तोतया महिला उभी करुन खरेदी विक्री

पोलीस चौकशीत अमोल अशोक मोरे व इरफान पटेल या दोघांनी  जेवूनिसा शफी या महिलेचे बनावट आधार कार्ड तयार केले. तसेच कागदपत्र बनावट असल्याने शेख अजीज शेख भिकारी, बिलकिस बी सरफुद्दीन शेख, रईस शेख शरीफ शेख, रामचंद्र वामन अहिरे, सुशील प्रेमचंद्र जैन यांची मदत घेतली. या पाचही जणांना जाणीव असून देखील त्यांनी आपसात संगणमत करून जेबुन्निसा मोहम्मद शफी यांच्या नावाने तोतया महिला उभी करून सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात दोनही प्लॉटची परस्पर खरेदी विक्री केल्याची बाब तपासात निदर्शनास आली. या संदर्भात मूळ मालक जेबुन्नीसा शफी यांचा मुलगा मोहम्मद शफीक मोहम्मद शफी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अमोल अशोक मोरे व इरफान रोप पटेल या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले आहे की ,धुळे शहरात अशा पद्धतीने मालमत्तांची परस्पर विल्हेवाट लावणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मालमत्ताधारकाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

Back to top button