Nashik Truck Terminus : अंबडला चार कोटी खर्चून उभारला जातोय ‘ट्रक टर्मिनस’

Nashik Truck Terminus : अंबडला चार कोटी खर्चून उभारला जातोय ‘ट्रक टर्मिनस’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या मुख्य औद्योगिक वसाहतीत प्रशस्त ट्रक टर्मिनस असावे या गेल्या दहा वर्षाच्या मागणीला अखेर यश आले आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील कोका कोला कंपनीजवळील 'ॲमिनिटी ५७' या भूखंडावर चार कोटी रुपये खर्चुन आठ हजार स्केअर फुट जागेवर ट्रक टर्मिनस उभारला जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी ट्रक चालकांसाठी मिनी रेस्तरॉं, विश्रांती गृह, वजनकाटा, पेट्रोलपंप यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुढील ७ ते ८ महिन्यात ट्रक टर्मिनलचे काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. (Nashik Truck Terminus)

शहरातील सातपूर आणि अंबड या प्रमुख औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल असावे यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनस अभावी कंटेनर, ट्रेलर रस्त्यावरच उभे करावे लागतात. त्यामुळे गंभीर अपघाताच्या घटनाही बऱ्याचदा समोर आल्या आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीत सीएट कंपनीसमोर ट्रक टर्मिनस असले तरी, सुविधांची वानवा असल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही. बऱ्याचदा तर चालक याठिकाणी ट्रक उभे न करता रस्त्याच्या कडेलाच ट्रक उभे करताना दिसतात. कंटेनर्सच्या अशाप्रकारच्या पार्किंगमुळे अवैध धंदेही वाढल्याच्या तक्रारी उद्याेजकांनी केल्या हाेत्या. नाशिकमध्ये मागील डिसेंबर महिन्यात, आयमामध्ये आलेल्या उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी ट्रक टर्मिनसची मागणी व गरज लक्षात घेत, सहा महिन्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले हाेते. यानंतर एमआयडीसीने तातडीने पावले उचलत अंबड औद्याेगिक वसाहतीत ट्रक टर्मिनसची उभारणी सुरू केली असून, पुढील सात ते आठ महिन्यात ताे कार्यान्वित हाेणार असल्याने रस्त्यावरील ट्रक, ट्रेलरच्या पार्किंगच्या समस्येतून उद्याेजक व कामगारांना दिलासा मिळणार आहे. (Nashik Truck Terminus)

अंबड औद्योगिक वसाहतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ट्रक टर्मिनसचा प्रश्न उद्याेगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री दादा भुसे यांच्या समवेतच्या बैठकीत निमाने केलेल्या आग्रही मागणीनंतर मार्गी लागत आहे. यामुळे एक चांगली व्यवस्था उद्याेगांना उपलब्ध हाेणार असून, यापेक्षाही माेठ्या जागेची अपेक्षा आम्हाला भविष्यात आहे.

– धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

ट्रक टर्मिनसबाबतची आमची संकल्पना वेगळी होती. त्यामुळे अंबडमध्ये उभारल्या जात असलेल्या ट्रक टर्मिनसविषयी आम्ही समाधानी नाही. ही बाब एमआयडीसीची प्रादेशिक अधिकारी आणि बांधकाम अभियंता यांच्या निर्दशनास आम्ही यापूर्वीच आणून दिली आहे. सातपूरमध्ये जो ट्रक टर्मिनस आहे, त्याठिकाणी सुविधांची प्रचंड वानवा आहे. अशात एमआयडीसीने सातपूर आयटीआय जवळील जागा टर्मिनससाठी उपलब्ध करून द्यावी.

राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news