Jalgaon Crime : चोरीच्या चार दुचाकींसह अट्टल चोरट्याला अटक | पुढारी

Jalgaon Crime : चोरीच्या चार दुचाकींसह अट्टल चोरट्याला अटक

जळगाव, शहरात मोठ्या प्रमाणात मोटरसायकली चोरी होत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी अट्टल चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या चोरीच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनी परिसरात रा. सिद्धार्थ लुल्ला यांची दुचाकी २५ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनच्या दिवशी तलाव परिसरातून चोरी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये संशयित आरोपी हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक हिरे यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, छगन तायडे आणि ललित नारखेडे असे पथक स्थापन केले आणि त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सुप्रीम कॉलनीमध्ये सापळा रचून संशयित प्रशांत उर्फ चोर बाप्या पडीत साबळे याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीच्या चार दुचाकी एक लाख 45 हजार रुपयांच्या काढून दिल्या.

पोलिसांनी चारही दुचाकी ताब्यात घेऊन संशयित आरोपीच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button