Nashik News : प्रांताधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करत जप्त डंपर घेऊन पोबारा | पुढारी

Nashik News : प्रांताधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करत जप्त डंपर घेऊन पोबारा

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांचा बनावट आदेश तयार करून तो बस आगाराच्या सुरक्षारक्षकास दाखवून, डंपर नेल्या प्रकरणी लासलगाव पोलिसांत राजू चिंतामण ढोकळ (रा. सिन्नर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विंचूरचे मंडळ अधिकारी संतोष डुंबरे हे त्यांचे गौण खनीज पथकातील इतर सहकारी तलाठी गणेश जगताप, शुभम पाटसकर, कोतवाल सागर म्हस्कर यांच्यासह गस्त घालत असताना धरणगाव ते विंचूर रस्त्यावर अनधिकृत गौण खनीज मुरुमाने भरलेला डंपर (क्रमांक एमएच ०४, सीडब्ल्यू ४९९२) वाहतूक करताना आढळला. त्यानुसार दि. ४ जुलै रोजी मंडळ अधिकारी डुंबरे यांनी तो डंपर जप्त करून पंचनामा करत डंपर लासलगाव बस आगारात उभा करत तेथील सुरक्षारक्षक यांच्याकडे जमा केला होता. डंपरमालक राजू ढोकळ यांनी निफाडच्या प्रांतांचा खोटा आदेश तयार केला. तो आदेश तेथील सुरक्षारक्षकास दाखवत फसवेगिरी करून डंपर घेऊन गेला. वाहन मुक्त करण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश दिलेले नसताना संबंधित डंपरमालक ढोकळ यांनी बनावट आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याने निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी डुंबरे यांच्या फिर्यादीवरून ढोकळविरुद्ध लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक मोकळ अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button