Nashik Bribe : चांदवडला पंधराशे रुपयांची लाच घेताना मुख्यालय सहायक गजाआड  | पुढारी

Nashik Bribe : चांदवडला पंधराशे रुपयांची लाच घेताना मुख्यालय सहायक गजाआड 

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वडीलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याच्या मोबदल्यात दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना चांदवड भूमीअभिलेख कार्यालयाचे मुख्यालय सहाय्यक अंजीनाथ बाबुराव रसाळ (५०) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील ३० वर्षीय तक्रारदाराची वडीलोपार्जित शेती जमिन आहे. या शेतीची मोजणी करण्यासाठी त्यांनी चांदवड भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज केला. या मोजणीसाठी तारीख देण्यासाठी मुख्यालय सहाय्यक रसाळ यांनी तीन हजारांची मागणी केली होती. यात तडजोडीअंती दीड हजारांची रक्कम ठरली. शुक्रवारी (दि.१) ही लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रसाळ यांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, हवालदार प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी आदींनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.

हेही वाचा :

Back to top button