युवा पिढीच नवभारत घडविण्यासाठी योगदान देईल : डॉ. प्रमोद सावंत

युवा पिढीच नवभारत घडविण्यासाठी योगदान देईल : डॉ. प्रमोद सावंत
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुढील 25 वर्षांत सर्वच क्षेत्रांत भरीव योगदान देऊन युवा पिढीच नवा भारत घडवेल. त्या द़ृष्टीने आत्मनिर्भर भारत संकल्पना ऊर्जास्रोत म्हणून काम करेल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'आत्मनिर्भर भारत आणि युवकांचे योगदान' या विषयावर विशेष व्याख्यानात ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 2020 रोजी 'स्वयंपूर्ण गोवा' योजनेचे उद्घाटन केले. प्रत्येक कुटुंबास वीज, पाणी, शौचालय आदी सुविधांची उपलब्धता करून दिली. विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या. अंत्योदय तत्त्वावर राबविलेल्या योजनांमुळे राज्य दूध, दुग्धजन्य पदार्थ, फलोत्पादन, फुलोत्पादन या क्षेत्रांत स्वयंपूर्ण तर झाले. अन्य राज्यांतही निर्यात करू लागले.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील म्हणाले, गोवा 450 गावांचे राज्य असल्याचे तेथे योजना राबविणे सोपे आहे. महाराष्ट्रासारख्या हजारो खेडी राज्यात योजना खालपर्यंत झिरपत नेणे जिकीरीचे आहे. जलयुक्त शिवार, 33 कोटी वृक्षलागवड, शेतकरी विमा योजना, स्टँड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया योजनांचा सकारात्मक परिणाम दिसला आहे. संरक्षणविषयक संशोधन व उत्पादन निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने 15 हजार कोटींची निर्यात करू शकलो. इथॅनॉल निर्मिती व 20 टक्के इंधनात मिसळल्यामुळे 2030 पर्यंत देशाला एक थेंबही कच्चे तेल आयात करण्याची गरज भासणार नाही.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, गोव्यात आत्मनिर्भर भारत योजना राबविल्यानेच पर्यटनापलीकडे गोवा राज्याच्या स्वयंपूर्णतेचा आदर्श देशभरात निर्माण होऊ शकला. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार आदी उपस्थित होते.

समूह विद्यापीठांच्या स्थापनेकडे वाढता कल

नव्या शैक्षणिक धोरणामुळे स्थानिक उद्योग-व्यवसायांच्या गरजेनुरूप शिक्षण व संशोधनाला प्रोत्साहन मिळत आहे. सध्या राज्यातील 200 महाविद्यालये व 42 विद्यापीठे स्वायत्त आहेत. समूह विद्यापीठांच्या स्थापनेकडे कल वाढत आहे. मातृभाषेतून शिक्षणामुळे घोकंपट्टीच्या पलीकडे विषयाचे आकलन विद्यार्थ्यांना होऊ लागले आहे. या सार्‍या बाबी देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देणार्‍या ठरत आहेत.

शिवाजी विद्यापीठात उलगडले 'स्वयंपूर्ण गोव्या'चे गमक

कौशल्य विकास योजनेद्वारे युवकांना स्किलींग-रिस्किलींग-अपस्किलींग पद्धतीने कौशल्य प्रशिक्षण दिले. दहावी ते पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 8 ते 15 हजार रुपयांचे मानधन देण्याची व्यवस्था केली. गावांमधून विविध प्रकारची उत्पादने वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-बाझार पोर्टल निर्माण केले. 'हॅलो गोंयकार'कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला. गोव्याच्या उपक्रमांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये प्रशंसा केली. सामाजिक सुरक्षा, समाधानाचा निर्देशांक, पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण संवर्धन या सर्वच निकषांवर गोवा देशात अव्वल कामगिरी करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news