Uttarkashi Tunnel Rescue : उत्तर काशी बोगद्यात मॅन्युअल ड्रिलिंग सुरू; 15 मीटर खोदले | पुढारी

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तर काशी बोगद्यात मॅन्युअल ड्रिलिंग सुरू; 15 मीटर खोदले

उत्तर काशी; वृत्तसंस्था : उत्तर काशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांसाठीचे बचावकार्य शुक्रवारपासून (24 नोव्हेंबर) थांबलेले होते. ते पूर्ववत सुरू झालेले आहे. कामगारांपर्यंत पोहोचण्याकरिता आता डोंगरमाथ्यावरून उभे खोदकाम केले जात आहे. पंधरा मीटरपर्यंत खोदकाम सोमवारी झाले. त्यासाठीची यंत्रसामग्री रविवारी दुपारीच डोंगरमाथ्यावर पोहोचली होती. आणखी कुठला अडथळा आला नाही तर येत्या 4-5 दिवसांत अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्यात यश येईल, असे बचावकार्यातील अधिकार्‍यांनी सांगितले.

व्हर्टिकल ड्रिलिंगच्या माध्यमातून डोंगरमाथ्यावरून खालच्या दिशेने छिद्र पाडले जाईल. अर्थात यात धोकाही अधिक आहे. कारण त्यामुळे माती, दगडे आत पडतील. अडकलेल्या मजुरांना त्यांच्या नातेवाईकांशी बोलता यावे म्हणून बोगद्यात लँडलाईन फोनही टाकण्यात आला. 21 नोव्हेंबरपासूनच सिल्कियारा बाजूकडून बोगद्यात आडवे खोदकाम सुरू होते. कामगारांपर्यंत पोहोचायला 10-12 मीटर अंतर बाकी होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी ड्रिलिंग मशिनसमोर रॉड आल्याने ड्रिलिंग मशिनचा शाफ्ट त्यात अडकला होता. तो शनिवारी काढण्यात आला.ब्लेडचे तुकडे अजूनही बोगद्यात अडकले आहेत. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून ड्रिलिंगचा प्लॅन बी आखण्यात आला आणि त्यावर अंमलबजावणी सुरू झाली. सतलज विद्युत महामंडळाकडून हे काम केले जात आहे.

Back to top button