Nashik News : पुढील आठवड्यात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर | पुढारी

Nashik News : पुढील आठवड्यात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी मनसेने कंबर कसली असून, संभाव्य नऊ उमेदवारांची नावे जाहीर करून मास्टरस्ट्रोक खेळला आहे. मात्र, कधीकाळी बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकच्या उमेदवारांचा या नऊमध्ये समावेश नसल्याने, इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात मनसेप्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याने, नाशिकच्या उमेदवारीवर चर्चा होऊन नाव जाहीर केले जाऊ शकते. अशात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आकड्यांचा खेळ सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळाचा नारा देत आपल्या संभाव्य नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. मनसेच्या नेत्यांनी राज्यभरात पाहणी करून तयार केलेल्या अहवालावरून मनसे २० मतदारसंघांत आपले शिलेदार उभे करणार असल्याने, महायुतीबरोबरच महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार आहे. दरम्यान, बुधवारी (दि.२२) मुंबई कृष्णकुंज येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला. यामध्ये राज्यातील तब्बल २० मतदारसंघांत उमेदवार देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र, उमेदवाराबाबतचा सस्पेन्स कायम असल्याने, उमेदवारीवरून स्थानिकांमध्ये सध्या रस्सीखेच दिसून येत आहे. वास्तविक, नाशिक मनसेचा बालेकिल्ला राहिलेला असल्याने संभाव्य नऊ उमेदवारांच्या यादीमध्ये नाशिकच्या उमेदवाराचे नाव अपेक्षित होते. परंतु तसे न घडल्याने, इच्छुकांचे राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याबरोबरच उमेदवारांच्या नावावर चर्चा किंबहुना शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे. २००९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविताना मनसे उमेदवाराने विजयी उमेदवारास चांगलाच घाम फोडला होता. मनसेकडून हेमंत गोडसे यांनी तब्बल दोन लाख १६ हजार ४७४ मते मिळविली होती. तर राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी दोन लाख ३८ हजार ७०६ मते मिळवत अवघ्या २२ हजार ३२ मतांनी विजय मिळवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीतही मनसेला अशाच चमत्काराची अपेक्षा आहे. मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, निवडणुकीत मनसेचा उमेदवार कुठे असेल, हे लवकरच दिसून येईल.

मतदारसंघातील गणित बदलले

नाशिक लोकसभा मतदारसंघात तीन अपवाद वगळता मराठा उमेदवारानेच विजयश्री खेचून आणली आहे. सध्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्न बघता, प्रत्येक पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करणार आहेत. अशात मनसेकडे कोणते पर्याय आहेत? यावर पक्षप्रमुखांकडून नक्कीच चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेकडून इच्छुकांमध्ये डॉ. प्रदीप पवार यांच्यासह माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम यांच्या नावाची चर्चा आहे.

हेही वाचा :

Back to top button