Nashik News | शिवमहापुराण कथेत जीवनाचे सार्थक : पंडित मिश्रा | पुढारी

Nashik News | शिवमहापुराण कथेत जीवनाचे सार्थक : पंडित मिश्रा

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- शिव महापुरानात २४ हजार श्लोक आहेत. हे सर्वसाधारण पुराण नाही. यातील एक शब्द देखील जीवन सार्थकी लावतो. त्यामुळे शिवमहापुराण कथा जीवनाचे सार्थक करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण श्री पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांनी केले.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नाने दोंदे मळा, पाथर्डी गाव येथे श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी प्रथम पुष्प गुफताना पंडित प्रदीपजी मिश्रा बोलत होते. प्रारंभी रामराव पाटील परिवाराने पूजन तर पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे स्वागत खा. हेमंत गोडसे, आ. सिमा हिरे, महेश हिरे, अजय बोरस्ते, अविष्कार भुसे, प्रशांत जाधव, प्रविण तिदमे, रंजन ठाकरे, अमोल जाधव, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, सोमनाथ बोराडे, शामकुमार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

पंडित मिश्रा म्हणाले, विश्वाची कल्याण करणारी गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी गोदे काठी राहणाऱ्या नाशिककरांची आहे. नदीवर आपण पूजेला, स्नानाला गेल्यास कचरा उचलून स्वछतेला हातभार लावला पाहिजे. मनुष्याने अंगातील अहंकार काढून टाकला पाहिजे. भगवान शंकर सर्वाच्या मदतीला धावून जातात. जीवात जीव असेपर्यंत भजन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. कार्तिक महिन्यात होणारी ही महापुराण कथा भगवान कार्तिकेचा कृपादृष्टी प्राप्त करणारी आहे असे त्यांनी सांगितले. कथेच्या शेवटी खा. हेमंत गोडसे, आ. सिमा हिरे, महेश हिरे, यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

कर्यक्रमस्थळी कडक पोलिस बंदोबस्त

कार्यक्रमस्थळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सुमारे ६०० पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच परिसरात पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. या साठी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली ११ पोलिस निरीक्षक ३० सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच पोलिस कर्मचारी ३२५ व वाहतूक शाखेचे २० अधिकारी व सुमारे २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

त्र्यंबकेश्वराचा देखावा आकर्षण

कार्यक्रमासाठी ८० बाय ४० चा भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून श्री त्र्यंबकेश्वराचा देखावा साकारण्यात आला असून, धनुष्यधारी प्रभू श्री रामाची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज व शिवलिंग उभारण्यात आले असून भाविकांसाठी आकर्षण बनले आहे.

हेही वाचा :

Back to top button