‘एक देश-एक निवडणूक’पक्ष नव्हे, तर राष्ट्रहिताचे : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद | पुढारी

‘एक देश-एक निवडणूक’पक्ष नव्हे, तर राष्ट्रहिताचे : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

रायबरेली; वृत्तसंस्था : ‘वन नेशन वन इलेक्शन’ धोरणाचा फायदा सत्ताधारी पक्षाला मिळणार आहे, असे कुणाला वाटणे याहून मोठी गमतीशीर बाब नाही. ‘एक देश – एक निवडणूक’ कुठल्याही पक्षाच्या नव्हे तर राष्ट्राच्या हिताची आहे. निवडणूक खर्चात बचत होईल आणि तो पैसा सत्तेत असेल त्या पक्षाला लोककल्याणाकडे वळविता येईल, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

भाजप असो अगर काँग्रेस, या योजनेत कुठलाही भेदभाव नाही, असेही ते ठामपणे म्हणाले. कोविंद हे वन नेशन – वन इलेक्शन कमिटीचे अध्यक्ष आहेत, हे येथे उल्लेखनीय! कोविंद एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आलेले होते. कधीतरी जवळपास प्रत्येक पक्षानेच या धोरणाला पाठिंबा दिलेला आहे. देशहितासाठी सर्व पक्षांनी या धोरणाला पाठिंबा द्यायला हवा, अशी माझी अपेक्षा आहे. संसदीय समिती, नीती आयोग आणि निवडणूक आयोगाचे अहवाल प्राप्त झालेले असून, या सर्व यंत्रणांनी हे धोरण लागू होणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सर्व काही व्यवस्थित पार पडले तर 2029 मधील लोकसभा निवडणुकीत हे धोरण अमलात येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button