नाशिककरांनी सोने खरेदीतून साधला धनवृद्धी योग | पुढारी

नाशिककरांनी सोने खरेदीतून साधला धनवृद्धी योग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशी येणाऱ्या धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अनेकांनी सोने खरेदीचा योग साधला. या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने, रात्री उशिरापर्यंत सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीचा दर कमी झाल्याने, ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला.

धनत्रयोदशीला सोने-चांदी, वाहने, भांडी, खाती, मालमत्ता, कुबेर यंत्र, झाडू, धने, गोमती चक्र, श्रीयंत्र, दक्षिणावर्ती शंख, एकमुखी नारळ, तुळस, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पितळेचा दिवा, मातीचा दिवा खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकांनी हा मुहूर्त साधत सोने-चांदीबरोबरच वाहन खरेदीला प्राधान्य दिले. जागतिक घडामोडींमुळे ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरांनी उसळी घेतली होती. त्यामुळे मुहूर्तावर सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला झळ बसत होती. दरम्यान, दिवाळी सुरू होताच, सोने दरात घसरण झाल्याने, धनत्रयोदशीला त्याचा लाभ झाल्याचे दिसून आले. गेल्या ४ नोव्हेंबरपासून सातत्याने सोने दरात घसरण होत आहे. गेल्या ६ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी 60 हजार ९७० रुपये इतका होता. १० नोव्हेंबरपर्यंत 60 हजार ११४ रुपये म्हणजेच ८५६ रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना त्याचा मोठा फायदा झाला. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी 50 हजार ६०३ रुपये इतका नोंदविला गेला.

दरम्यान, सकाळपासूनच सोने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसून आला. यावेळी सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांच्या स्वागतासाठी विशेष तयारी केल्याचे दिसून आले. काही व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांना भेटवस्तूही दिल्या. दिवसभर सुरू असलेली ग्राहकांची रेलचेल रात्री उशिरापर्यंत बघावयास मिळाली. दरम्यान, सोने खरेदीतून मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

दिवसभर ग्राहकांची चांगली गर्दी होती. त्यामुळे सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण होते. गेल्या दोन दिवसांत दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण बघावयास मिळाले. पुढील काही दिवसांत दर कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

– चेतन राजापूरकर, राज्य संचालक, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन

हेही वाचा :

Back to top button