‘गंगावेश’चा ‘महाराष्ट्र केसरी’चा दुष्काळ 39 वर्षांनी संपला | पुढारी

‘गंगावेश’चा ‘महाराष्ट्र केसरी’चा दुष्काळ 39 वर्षांनी संपला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी फायनलमध्ये सिकंदर शेखने गतविजेता शिवराज राक्षेला झोळी डावावर धूळ चारून महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. सिकंदरने शाहू विजयी गंगावेश तालमीचा 39 वर्षांचा महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ संपवला. 1984 साली नामदेव मोळे यांनी हा किताब पटकावला होता. गंगावेश चौकात पैलवानांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.

गतवर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब गमावल्यानंतर सिकंदर शेखने पुन्हा तयारी सुरू केली होती. त्याचे वस्ताद विश्वास हारुगले यांनीही या पराभवाचा वचपा घेण्याचा चंग बांधला होता.

बारा ते चौदा तास सराव

सिकंदर सकाळी सहा तास आणि दुपारनंतर सहा तास सराव करीत होता. वर्षभर त्याने गंगावेश तालीम येथे नित्य सरावात खंड पडू दिला नाही. मागील पराभवातील चुकांचा अभ्यासही त्याने केला. पैलवान अनिल हराळे, उत्तम पाटील, तुकाराम पाटील यांनी सिकंदरला यामध्ये मोलाची साथ दिली.

39 वर्षांचा दुष्काळ संपला

1984 साली नामदेव मोळे यांनी गंगावेश तालमीसाठी महाराष्ट्र केसरीची गदा आणली होती. मात्र, यानंतर तालमीला या स्पर्धेत यश आले नव्हते. यामुळे यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब तालमीचा दुष्काळ संपवणारा ठरला असल्याची प्रतिक्रिया वस्ताद हारुगले यांनी व्यक्त केली.

Back to top button