नाशिक : वयाच्या ७ व्या वर्षी अथर्वकडून कळसुबाई शिखर सर | पुढारी

नाशिक : वयाच्या ७ व्या वर्षी अथर्वकडून कळसुबाई शिखर सर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वयाच्या ७ व्या वर्षी अथर्व जगताप या चिमुकल्याने कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेत राज्यातील सर्वात उंच शिखर असून, समुद्रसपाटीपासून त्याची उंची १६४६ मी. इतकी आहे. शिखरावर चढाई करण्यास कठीण वाट आहे. अशा खडतर मार्गाने अथर्व मनोहर जगताप या सात वर्षाच्या चिमुकल्याने २ तास ३२ मिनिटांत कळसुबाई शिखर सर केले. याआधीही वयाच्या सहाव्या वर्षी त्याने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर सर करत शौर्य दाखवले होते. तसेच ब्रह्मगिरी, रामशेज, धोडप किल्ले सर केले असून, लहान वयात ट्रेकिंगची त्यास आवड असून, जिद्दीने शिखर चढाई करतो. तो उत्तम योग खेळाडूही आहे. त्याच्या बालशौर्याची दखल केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी घेत रविवारी (दि. ५) रुंगठा हायस्कूल सभागृहात पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला.

त्याच्या या यशाबद्दल खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, नागरी संरक्षणचे उपनियंत्रक सुधाकर सूर्यवंशी, डॉ. सतीश साळुंके, अभिनव बालविकास शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, वर्गशिक्षक उज्ज्वला उनवणे आणि क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

हेही वाचा :

Back to top button