Pune : धानोरी रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

Pune : धानोरी रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी चौकातून धानोरीकडे जाणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण एका दशकाहून अधिक काळापासून रखडले आहे. या ठिकाणी रुंदीकरणास अडथळा ठरणार्‍या सुमेध बुद्ध विहाराचे लवकरच नवीन जागेत स्थलांतर होणार आहे. यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी विश्रांतवाडी ते धानोरी सिमेंट रस्त्याचे रुंदीकरण केले होते. मात्र, विश्रांतवाडी चौकाजवळील सुमेध बुद्ध विहारासाठी पर्यायी जागा नसल्याने येथील वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये सुमेध बौद्ध विहाराचे पदाधिकारी, महापालिका प्रशासन व संबंधित बांधकाम व्यावसायिक यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न माजी नगरसेवक करीत होते. या कामी आमदार सुनील टिंगरे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, माजी नगरसेविका रेखा टिंगरे, ऐश्वर्या जाधव, बांधकाम व्यावायिक प्रमोद अग्रवाल आणि विहाराच्या सभासदांनी पुढाकार घेऊन बौद्ध विहाराच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावला आहे. धम्म प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून नवीन बौद्ध विहारचे भूमिपूजनही केले असून, येत्या काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. माजी नगरसेवक अनिल टिंगरे म्हणाले, '1957 साली हे विहार बांधण्यात आलेले होते. त्यामुळे येथील विहार बौद्ध समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. आता विहाराच्या स्थलांतराचा प्रश्न सुटल्याने लवकरच धानोरी रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न सुटेल.'

पर्यायी जागा मिळवून देण्यासाठी व विहाराचे काम प्रत्यक्ष चालू होण्यासाठी प्रयत्न केले. नुकतेच भूमिपूजन झाले आहे. लवकरच नवीन बुद्ध विहार तयार होईल.
                                                                      -सुनील टिंगरे, आमदार.

1987 च्या डीपी प्लॅनमध्ये धानोरी रस्त्याचा समावेश होता. बौद्ध समाजाच्या भावना व वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन उपमहापौर असताना प्रशासन व संबंधितांच्या बैठका घेऊन यावर तोडगा काढला.
                                                     -डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपहापौर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news