Drugs Case : आमिषाला भुलला अन् अडकला, ड्रग्ज कारखान्याचा करार करणारा गजाआड | पुढारी

Drugs Case : आमिषाला भुलला अन् अडकला, ड्रग्ज कारखान्याचा करार करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सोलापूरच्या माेहोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत नाशिक पोलिसांनी कारवाई करीत एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केला. सखोल तपासात हा कारखाना मनोहर पांडुरंग काळे (रा. देवळाली गाव) याने त्याच्या नावे भाडेतत्त्वावर घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी काळे यास अटक केली आहे. काळे यास संशयित सनी पगारेकडून दरमहा वीस हजार रुपये मिळत असल्याचेही उघड झाले आहे.

नाशिक अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शाखा एकच्या पथकाने संयुक्तरीत्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील एमआयडीसीत एमडी तयार होणारा कारखाना शुक्रवारी (दि.२७) उद्ध्वस्त केला. पथकाने कारखान्यातून सुमारे सात कोटी रुपयांचे एमडी, कच्चा माल व एमडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. सखोल तपासात हा कारखाना मनोहर काळे याने भाडेतत्त्वाने घेतल्याचे उघड झाले. त्यासाठी काळेने कारखाना मालकासोबत रीतसर करार केल्याचे उघड झाले. पोलिसांनी काळेकडे चौकशी केल्यानंतर सनी पगारेच्या सांगण्यावरून सोलापूरमधील कारखाना भाडेतत्त्वावर घेतल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास पोलिस कोठडी सुनावली.

कारखान्यासाठी झालेला कायदेशीर करार हा मराठी भाषेत असूनही संशयित काळे याच्या काही लक्षात आले नाही. केवळ एका केमिकल कंपनीसाठी हा करार केल्याचे त्यास वाटल्याचे त्याने पोलिसांकडे सांगितले. दरम्यान, सामनगाव येथे पकडलेल्या एमडी प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी नऊ संशयित पकडले असून, त्यांच्याकडून सुमारे १० किलो एमडी साठाही जप्त केला आहे. तसेच एमडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली.

पगारेच्या आमिषाला भुलला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी मनोहर काळे हा सनी पगारेच्या कार्यालयात काच बसवण्यासाठी गेला होता. तेथे सनीने मनोहरला दरमहा २० हजार रुपये देतो त्या मोबदल्यात माझ्याकडे काम कर, असे सांगितले. त्यानुसार मनोहर सनीकडे कामास लागला. त्यानंतर सनीने मनोहरला त्याच्याच नावे भाडेतत्त्वावर कारखाना घेण्यास सांगत स्वत:ची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला.

या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न

सामनगाव एमडी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ संशयित पकडले असले तरी त्यांनी कारखान्यातून माल कुठे नेला, किती एमडी तयार केले, एमडी विक्रीतून आलेले पैसे कुठे गुंतवले, एमडीसाठी आर्थिक मदत कोणी केली, एमडी बनवण्याचा फॉर्म्युला कोणाचा होता, कारखान्यात कोण काम करायचे या प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत. तर सराईत गुन्हेगार अक्षय नाईकवाडे (रा. नाशिक) याचाही पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचा :

Back to top button