Chhagan Bhujbal : होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट? | पुढारी

Chhagan Bhujbal : होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

नाशिक : मिलिंद सजगुरे

मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्यभरात वातावरण तापले असतानाच सत्तेमधील पक्षनेत्यांबाबत या समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही राजकीय अंगाने चटके बसण्यास प्रारंभ झाला आहे. लासलगावचे नेते जयदत्त होळकर यांच्यापाठोपाठ नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता गडद होत चालल्याचे मानण्यात येत आहे.

येनकेन प्रकारे आरक्षण मिळवायचे अशी खुणगाठ बांधून मराठा बांधव एकवटल्याचे चित्र गेल्या काही काळात राज्यभर निर्माण झाले आहे. यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाच्या शीर्षस्थानी असलेल्या मनोज जरांगे- पाटील या अराजकीय चेहऱ्याने अवघे वातावरण ढवळून काढले आहे. मराठा समाजातील ही जनजागृती थेट गावपातळीवर येऊन पोहोचल्याने या आंदोलनाचे सुकाणू एकार्थी सर्वसामान्यांकडे आले आहे. आंदोलनाची धग लक्षात घेता, समस्त राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली असली, तरी सत्तेतल्यांना त्याची अधिक झळ बसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सतत चर्चेत असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांचे दोन निकटवर्तीय नेते त्यांच्यापासून दूर जाण्यास केवळ मराठा आरक्षण मुद्दा कारणीभूत ठरला आहे. लासलगावचे माजी सरपंच तथा बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांचा हात सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पाठोपाठ नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनीही मराठा आरक्षण विरोधक अशी संभावना करत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना अलविदा केला. मनमाड बाजार समिती सभापती पदावरूनही ते पायउतार झाले.

वस्तुतः, जयदत्त होळकर आणि संजय पवार हे भुजबळ यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून जिल्हाभर ज्ञात होते. भुजबळ यांनी येवल्याचा गड चारदा जिंकताना ४६ गावांनी त्यांना दिलेला कौल निर्णायक ठरला. यामध्ये होळकर यांची भूमिका बिनीची असल्याचे सर्वज्ञात आहे. येवले तालुक्यात ज्येष्ठ नेते अंबादास बनकर वगळता, ‘व्होट बॅंक’ क्षमता बाळगून असलेले आमदार दराडे बंधू, माणिकराव शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार आदी मातब्बर नेते आधीच भुजबळ यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामध्ये आता होळकर यांची भर पडल्याने भुजबळ यांच्या येवल्यापुरत्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिकडे नांदगावमध्ये संजय पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने ते भुजबळ यांचे कडवे विरोधक आणि विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याशी हातमिळवणी करतात की, अन्य मार्ग चोखाळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नांदगावमध्ये विद्यमान आमदार शिंदे गटाचा असल्याने आणि राज्यस्तरावर शिंदे गट-अजित पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महायुतीमध्ये असल्याने तूर्तास पंकज भुजबळ यांची दावेदारी प्रबळ मानण्याचे कारण नाही. तथापि, इतर सत्तास्थानांत कांदे यांना मात देण्यासाठी भुजबळ  यांनी आखलेल्या रणनीतीला संजय पवार यांच्या निर्णयाने सुरूंग लागल्याची चर्चा आहे. होळकर आणि पवार यांच्या जाण्याचा अनपेक्षित राजकीय धक्का भुजबळ कसा हाताळतात, हे पाहणे आगामी काळात रंजक ठरणार आहे. (Chhagan Bhujbal)

पक्ष संघटनेवरील पकड कायम राहील ?

सत्तेमध्ये असो की विरोधात, छगन भुजबळ यांचे नाशिक जिल्हा राजकारणातील महत्त्व सलग वीस वर्षे अबाधित राहिले आहे. जिल्ह्यात पक्षाचे पदाधिकारी नियुक्त करण्यापासून ते खासदार-आमदारकीसाठी उमेदवारी देण्यापर्यंत भुजबळ यांचा शब्द प्रमाण राहिला आहे. मध्यंतरी ते तुरुंगवासात असतानादेखील एकत्रित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हास्तरीय निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच घेतले गेल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. याच अनुषंगाने शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात असतानाही सर्व सहा आमदार आणि प्रमुख पदाधिकारी अजित पवार गटासोबत राहिले. त्याचे बव्हंशी श्रेय भुजबळ यांना जाते. आता मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ यांना धक्क्यावर धक्के बसत असताना नजीकच्या काळात त्यांची पक्ष संघटनेवरील पकड कायम राहते का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

हेही वाचा :

Back to top button