बुद्धांचे मौलिक विचारच जगाला वाचवू शकतात : छगन भुजबळ | पुढारी

बुद्धांचे मौलिक विचारच जगाला वाचवू शकतात : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्रीलंकेतून बोधिवृक्ष येथे आणला ही श्रीलंकेची नाशिक आणि महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे. शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांचे मौलिक विचार जगासाठी आजही तितकेच प्रेरक असून, तेच जगाला वाचवू शकतात. यामुळे या विचारांचा प्रसार-प्रचार होण्याची गरज असल्याचे भावना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे राज्य शासन व शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर श्रीलंका येथील बोधिवृक्षाचे प्रमुख पूजनीय हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुर विक्रमनायके, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पर्यटन, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, श्रीलंका येथील महिंदावस थेरो, भिक्खू डॉ. वास्कडूवे, मलेशिया येथील महाथेरो संघराजा, भिक्खू सरणांकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो, भिक्खू नाराणपणावे, भिक्खू डॉ. पोंचाय, भिक्खू संघ सल्लागार प्रा. डॉ. भदन्त खेमधम्मो महास्थवीर, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. सरोज आहिरे, आ. राहुल ढिकले, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरो, भिक्खू संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, बार्टीचे संचालक सुनील वारे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खा. समीर भुजबळ, माजी आ. पंकज भुजबळ, समिती सदस्य आनंद सोनवणे, रंजन ठाकरे, प्रकाश लोंढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, बौद्ध अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, नाशिकच्या भूमीत त्रिरश्मी बुद्धलेणी येथील बुद्धस्मारक परिसरात भगवान बुद्धांना ज्या महाबोधिवृक्षाच्या छायेत सिद्धी मिळाली, त्या महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण होत आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे. विजयादशीच्या दिवसाचे औचित्य साधून महाबोधिवृक्ष महोत्सव साजरा होत आहे. या सोहळ्यात बुद्धांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. या महाबोधिवृक्षामुळे नाशिकच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. जे जे चांगले, उदात्त आहेत ते ते नाशिकमध्ये येण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी 18 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला. तथागत बुद्धांचे ज्ञान व बोधिवृक्ष हे भारताच्या इतिहासाच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणता येईल. बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाने जीवन सुखकर करता येत असल्याने या अष्टांगिक मार्गाचा अवलंब जीवनात करावा, असे आवाहन त्यांनी केले. महाबोधिवृक्षाच्या रोपणाने नाशिकमध्ये बुद्धांच्या ऊर्जादायी विचारांची सुरुवात या वृक्षारोपणच्या माध्यमातून झाली आहे, ही नाशिकसाठी गौरवाची बाब असल्याची भावना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक महाबोधिवृक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केली असून, नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा समारंभ आहे. यामुळे नाशिक जगाच्या नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाबोधिवृक्षामुळे नाशिकला वेगळी ओळख

पालकमंत्री दादा भुसे यांनी सम्राट अशोक विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात नाशिकमध्येच श्रीलंकेतील अनुराधापूरच्या महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले आहे. या महाबोधिवृक्षामुळे नाशिकची वेगळी ओळख निर्माण होणार असून, ही आपल्या सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार काढले.

हेही वाचा :

Back to top button