

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एमडी प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील व शहरातील ड्रग्ज पेडलर अर्जुन पिवाल, सनी पगारे यांच्यात सुरुवातीपासून संबंध होते. मात्र दोघांमध्ये मैत्रीचे नव्हे, तर वैमनस्याचे संबंध असल्याचे उघड झाले. ललितच्या कारचा अपहार करीत त्याच्याकडून खंडणी घेतल्या प्रकरणी अर्जुन पिवाल आणि सनी पगारे यांच्याविरोधात फेब्रुवारी २०१९ मध्ये उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ललितने त्याचा भाऊ भूषण आणि मित्र अभिषेक बलकवडे यांच्या मदतीने शिंदे गावात एमडी तयार करण्यासाठी कारखाना उभारल्याचे उघड झाले. त्यामुळे मुंबई व पुणे पाेलिसांनी कारवाई करीत तिघांना पकडले, तर नाशिक पोलिसांनी स्वतंत्र तपास करीत सामनगाव येथील एकाला ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपातून अर्जुन पिवाल, सनी पगारे यांना अटक केली. पोलिस तपासात ललित आणि त्याच्या साथीदारांनी खबरदारी म्हणून तयार केलेले एमडी नाशिक जिल्ह्यात वितरीत न करता परजिल्ह्यात दिले, तर दुसरीकडे अर्जुन आणि सनी यांनी शहरात एमडीचा पुरवठा करण्यास सुरुवात केल्याचे पोलिस तपासात समोर आले. मात्र संशयितांनी मुंबईतील पुरवठादारांकडून ड्रग्ज खरेदी केल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या गुन्ह्यांमध्ये अद्याप ललित आणि अर्जुन-सनी यांचा प्रत्यक्ष संबंध नसल्याचे तपासातून समोर येत आहे. मात्र ललितचे अर्जुन आणि सनी यांच्याशी वाद होते.
तीन लाखांची खंडणी
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जुन आणि सनी यांनी ललितकडील कार ४ ते ५ दिवस वापरण्यास घेतली होती. मात्र कारचा ताबा परत देण्यास दोघांनी नकार देत ललितकडून एक लाख ८० हजार रुपये घेतले. त्यानंतरही दोघांनी तीन लाख रुपयांची मागणी केल्याचे ललितने उपनगर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे दोघांविरोधात खंडणी, अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललितने दोघांकडून उधार पैसे घेतले होते, मात्र ते वेळेत दिले नव्हते.
पॅटर्न एकच, ध्येय वेगवेगळे
ललित, अर्जुन आणि सनी या तिघांविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तिघेही मध्यवर्ती कारागृहात गेले असून, तेथेच त्यांनी इतर गुन्हेगारांच्या संपर्कात येत एमडी विक्री करण्यास सुरुवात केली होती. कालांतराने ललितने पैशांच्या जोरावर शिंदे गावात एमडी तयार करण्यासाठी कारखानाच टाकल्याचे उघड झाले, तर अर्जुन व सनी यांनीच शहरात पहिल्यांदा एमडी विक्री केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. त्यामुळे एमडीच्या विश्वात शिरण्याचा तिघांचा पॅटर्न कारागृहातून तयार झाला.
तिघेही सराईत
पोलिसांकडील दाखल गुन्ह्यांनुसार अर्जुन, सनी व ललित यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. अर्जुन, सनी व मनोज उर्फ मन्ना गांगुर्डे यांचा अनेक गुन्ह्यांमध्ये एकत्र सहभाग आढळून आला आहे. त्यात खंडणी, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे, तर ललितवरही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
खंडणी प्रकरणात तारीख पे तारीख
ललितच्या फिर्यादीनुसार, अर्जुन व सनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. मात्र या गुन्ह्यात अद्याप दोघेही न्यायालयासमोर हजर हाेत नसल्याचे उघड झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने काही तारखा पुढे ढकलण्यात आल्या, मात्र अन्य तारखांना संशयित हजर नसल्याने पुढील तारीख देण्यात आली.
हेही वाचा :