

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; नांदगावचे ग्रामदैवत असलेल्या एकवीरा देवीचे मंदिर शाकंभरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. जागृत आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी, अशी या मंदिराची ख्याती आहे. सतराव्या शतकात ब्रम्हानंद महाराज यांना देवीचा दृष्टांत झाला आणि पेशव्यांच्या मदतीने त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.
संपुर्णपणे आखीव रेखीव दगडांमध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून, आजही मंदिर भक्कम स्थितीत उभे आहे. मंदिरासमोरच तीस फुट उंचीची दगडी दीपमाळ आणि त्याखाली असलेलं श्रीगणेशाचं एक छोटस मंदिर आहे. दर्शनाला जाण्यापूर्वी गणरायाचे दर्शन होते आणि त्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश होतो. बाजूलाच रेणुका माता आणि श्री गणेशाची मूर्ती आहे. या मंदिराला दोन घुमट आहेत. दुसऱ्या गाभाऱ्यात एकवीरा देवीची स्वयंभू मूर्ती आहे. दगडाची मूर्ती पूर्वी शेंदूरचर्चित होती जिचा नंतर जिर्णोद्धार झाला. अकरा फूट उंच असलेली ही मूर्ती सप्तशृंगी निवासिनी देवी प्रमाणेच आहे. देवीला अठराभुजा असून तिच्या प्रत्येक हातात विविध प्रकारचे शस्त्र आहेत. चैत्रोत्सव काळात आणि शारदीय नवरात्रोत्सव काळात येथे यात्रा भरते. नवरात्रोत्सवात महिला भाविक नऊ दिवस घटी बसवतात. नवसाला पावणारी एकवीरा देवी ग्रामदेवतेवर येथील भाविकांची अपार श्रध्दा आहे.
हेही वाचा :