नाशिक क्राईम : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या २६ जनावरांची सुटका | पुढारी

नाशिक क्राईम : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या २६ जनावरांची सुटका

चांदवड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा मालट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल एक तास सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांच्या तावडीत दिला. ट्रकमध्ये तब्बल २८ जनावरे भरलेले असल्याने त्यात गुदमरून एक गाय व वासराचा मृत्यू झाला. तर २६ जनावरांची सुटका करण्यात आली. या झटापटीत ट्रक हिवरखेडे येथील पेट्रोलपंपाच्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकला. यावेळी ट्रकमधील तिघे संशयित शेतात पळून गेले, तर एकाला नागरिकांनी पकडून चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले.

राहुड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर देवळामार्गे ट्रक (एम. एच. ०९ एल. ५४४९) बुधवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास आला. त्यावेळी बजरंग दल व गोरक्षण दलाचे काही कार्यकर्ते यांना ट्रकमधील व्यक्तींचा संशय आला. यामुळे त्यांनी ट्रकची चौकशी केली असता संशयितांनी ट्रक मालेगावच्या दिशेने न नेता दुगावकडे भरधाव वेगात नेला. या ट्रकचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. त्यामुळे जनावरांना घेऊन जाणाऱ्या संशयितांनी ट्रक दुगावकडून पुन्हा चांदवडकडे वळवला. बजरंग दलाचे कार्यकर्ते ट्रकमागेच असल्याने संशयितांनी ट्रक चांदवडच्या लासलगाव चौफुलीवरून पुन्हा लासलगावच्या दिशेने वळवला. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी पोलिसांसह त्या ट्रकचा पाठलाग केला. यामुळे भयभीत झालेल्या ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हिवरखेडे येथील एका पेट्रोलपंपाच्या संरक्षण भिंतीला ट्रकने धडक दिली. त्यानंतर संशयितांनी ट्रक एका शेतात नेत ट्रकमधील चौघांपैकी तिघे जण मक्याच्या शेतात पळून गेले तर जुनेद रियाज अहमद (२२, आझादनगर, मालेगाव) यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

ट्रकमध्ये एकूण १ लाख ७४ हजार रुपये किमतीचे २८ जनावरांची सुटका केली असून, सहा लाख रुपये किमतीची ट्रक असा एकूण ७ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी जुनेद रियाज अहमद याच्या विरोधात बेकायदेशीर जनावरांची गोवंश हत्या व वाहतूक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button