धुळे : स्वच्छ भारत अभियानातंर्गत‘एक तारीख एक तास’ स्वच्छता मोहिमेचे आयोजन | पुढारी

धुळे : स्वच्छ भारत अभियानातंर्गत‘एक तारीख एक तास’ स्वच्छता मोहिमेचे आयोजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा,  स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छता सेवा 2023 पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नागरी आणि ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा स्वच्छता श्रमदान उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

संबधित बातम्या :

स्वच्छ भारत अभियानांतर्गत दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. कचरा मुक्त भारत अशी या वर्षाची संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘एक तारीख एक तास’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व नागरी तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक वॉर्ड, ग्रामपंचायतीमध्ये श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. सदर उपक्रमात नागरिकांद्वारे प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात येईल आणि स्वच्छता उपक्रमाचा दृश्य परिणाम दिसण्याच्या दृष्टीने श्रमदान करण्यात येणार आहे. प्रत्येक वार्ड, ग्रामपंचायत अंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वेलाईन, बसस्थानक, राष्ट्रीय, राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, जलस्रोत, नदी घाट, झोपडपट्टया, पूला खालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोलनाके, प्राणी संग्रहालय, गोशाळा, डोंगर, रहिवास क्षेत्र, आरोग्य संस्था, आसपासचा परिसर, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल.

लोकसहभागातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थी, महिला बचत गट, स्वच्छतासेवक यासह समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवुन 1 ऑक्टोबर रोजीचा स्वच्छता मोहिमेचा हा उपक्रम यशस्वी करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button