भारतात खेळण्याचा दबाव नाही : बाबर आझम | पुढारी

भारतात खेळण्याचा दबाव नाही : बाबर आझम

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : भारतात खेळण्याचा कोणताही दबाव नाही, आम्ही कुठेही खेळण्यासाठी तयार आहोत, असे विधान पकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेत केले आहे. भारतात होणार्‍या विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ भारताच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बाबरने विविध बाबींवर भाष्य केले.

पाकिस्तानच्या संघात मोजकेच असे खेळाडू आहेत, ज्यांनी भारतीय भूमीवर क्रिकेट खेळले आहे. याबद्दल बोलताना बाबरने सांगितले की, भारतात खेळण्याचा कोणताही दबाव नाही. तेथील खेळपट्टीबद्दल जाणकारांशी चर्चा केली आहे, त्यांनी सविस्तर माहिती दिली असून, भारतात फिरकीपटूंना मदत मिळते, असे मी ऐकून आहे. त्यामुळे आम्ही कुठेही खेळण्यासाठी तयार आहोत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. बाबरने पुढे सांगितले की, मी पाकिस्तानचे नेतृत्व करतोय ही एक अभिमानाची बाब आहे. नक्कीच आम्ही चांगले क्रिकेट खेळू अन् वर्ल्डकप पाकिस्तानात घेऊन येऊ. आशिया चषकात काय झाले त्यातून आम्ही शिकलो असून, त्यावर चर्चा केली आहे. चुका कशा सुधारता येतील, यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

पाकिस्तानी संघ विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात चौथ्या स्थानावर राहील, असे अनेकजण म्हणत आहेत. याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता बाबरने म्हटले, नंबर चार हा चुकीचा क्रमांक आहे, आम्ही नक्कीच विश्वचषक जिंकू. माझा माझ्या 15 सदस्यीय संघावर पूर्ण विश्वास आहे आणि ते चोख कामगिरी पार पाडतील.

Back to top button