देवळा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध दारू उत्पादनांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात काही जण एका शेतातील शेडमध्ये अवैधरित्या बनावट देशी व विदेशी दारू बनविण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती मिळाली होती. (Nashik Crime News)
त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक दत्ता काभिरे यांच्या पथकाने डोंगरगाव शिवारात संशयित कैलास आहिरे यांचे शेतातील घराच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये धाड टाकली. याठिकाणी कैलास मुरलीधर आहिरे, प्रतिक कैलास आहिरे, (दोघे रा. डोंगरगाव, ता. देवळा) हे विनापरवाना बेकायदा बनावट देशी व विदेशी दारू तयार करत असल्याचे आढळून आले. यावेळी बनावट देशी व विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व साधने, दारू विकी व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहन असा १० लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Nashik Crime News)
यातील दोन्ही आरोपींविरुध्द देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीविरुद्ध यापूर्वी देवळा, सटाणा, सुरगाणा पोलीस ठाण्यांमध्ये दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे केदार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता काभिरे, पोलीस नाईक संतोष थेटे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण करवर, धनंजय देशमुख, मनोज सानप, कल्पना लहांगे, चालक गोपीनाथ बहिरम यांनी केली.
हेही वाचा