Nashik Crime : तोतया जागामालक उभा करून बंगला हडपला, चौघांविरोधात गुन्हा | पुढारी

Nashik Crime : तोतया जागामालक उभा करून बंगला हडपला, चौघांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आडगाव शिवारातील १५३.१९ चौरस मीटर जागेवर बांधलेला बंगला हडपण्यासाठी चौघा संशयितांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे व तोतया जागामालक उभा करून बंगला खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Crime)

विशाल सोमनाथ गाढवे (२६, सध्या रा. ता. कोपरगाव, मूळ रा. घरकुल योजना, चुंचाळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आडगाव पोलिस ठाण्यात नवनाथ साहेबराव नजन, सतीश सुभाष पुरोहित, महेंद्र विनायक पानकर आणि प्रशांत बडगुजर या संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी संगनमत करून फेब्रुवारी २०२० मध्ये हा गंडा घातला. संशयितांनी १३ फेब्रुवारी २०२० रोजी राजाराम कडूशेठ पोतदार नावाचा बनावट व्यक्ती उभा केला. पोतदार यांच्या नावे आधार कार्ड व इतर खोटी कागदपत्रे सादर करून बंगल्याचा व्यवहार केला. ही बाब लक्षात आल्यावर जागा मालकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे संशयितांविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. अर्जावरून चौकशी करून आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button