Manoj Jarange Patil : जरांगे-पाटील लवकरच नाशिकमध्ये, मराठा साखळी उपोषणाला देणार भेट

Maratha reservation-Manoj Jarange patil
Maratha reservation-Manoj Jarange patil

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज, शिवतीर्थ येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या नाशिक जिल्हा सकल मराठा समाज साखळी उपोषणाला मनोज जरांगे-पाटील भेट देणार आहेत. जरांगे-पाटील यांनी राज्यातील प्रत्येक उपोषणस्थळी भेट देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, लवकरच नाशिकला येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपोषणाच्या अकराव्या दिवसानंतरही प्रशासनाकडूनच कुठलीच विचारणा झाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे.

संबधित बातम्या :

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, योगेश नाटकर, राम खुर्दळ, राम निकम, नितीन रोटे, संजय फडोळ, अॅड. कैलास खांडबहाले, विकास देशमुख, संदीप खुटे, योगेश कापसे, राम गहिरे, भास्कर पाटील, महेंद्र बेहेरे, पवन पवार यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. आतापर्यंत या उपोषणाला विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी, संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. राज्य सरकारने जरांगे-पाटील यांना दिलेले आश्वासन पूर्ण होईपर्यंत म्हणजेच ४० दिवसांपर्यंत हे उपोषण चालणार आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी राज्यातील प्रत्येक उपोषणस्थळी भेट देणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर नाशिकमधून योगेश नाटकर-पाटील आणि कैलास खांडबहाले यांनी त्यांना संपर्क केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून नाशिकमधील साखळी उपोषणाची त्यांना माहिती दिली. यावेळी जरांगे-पाटील यांनी लवकरच उपोषणाला भेट देणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यभरातील उपोषणस्थळी जाणार असून, लवकरच नाशिकचा दौरा निश्चित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपोषणाच्या अकरा दिवसानंतरही प्रशासनाकडून कोणतीच विचारणा केली जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच उपोषण सुरू असल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत कोणीच भेट दिली नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्याउलट स्थानिक खासदार, आमदार, पक्षांचे पदाधिकारी, संघटनांकडून सातत्याने उपोषणाला पाठिंबा दर्शविला जात आहे.

४० दिवस उपोषण

राज्य सरकारने मनोज जरांगे यांना ४० दिवसांत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नाशिकमधील सकल मराठा समाजाकडून पुढील ४० दिवस साखळी उपोषण केले जाणार आहे. गेल्या ११ दिवसांपासून उपोषण सुरू असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांकडून बोलून दाखविला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news