लवंगी मिरची : अध्यापन आणि तळमळ

लवंगी मिरची : अध्यापन आणि तळमळ

छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापकांच्या 73 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. नुकतेच असे वाचण्यात आले की, या जागांसाठी जवळपास वीस पोते भरून गठ्ठे होतील एवढे अर्ज आले आहेत. आश्चर्य वाटले ना? वाटणारच. याचा अर्थ प्राध्यापक पदाच्या जागा निघाल्यात म्हणून वाट पाहत असलेले असंख्य उमेदवार तयार होते आणि एकदाची जाहिरात आल्याबरोबर या उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी उड्या पडल्या. आधी काही दिवस ऑनलाईन अर्ज करायचे होते आणि नंतर विशिष्ट तीन दिवस हार्डकॉपी सादर करण्यासाठी दिलेले होते. त्यादिवशी विद्यापीठात अक्षरशः शेकडो उमेदवारांची गर्दी झाली होती आणि रांगा लावून उमेदवार आपापले अर्ज जमा करत होते.

किती बरे ही अध्यापन क्षेत्रामध्ये येण्यासाठी तळमळ? म्हणजे इथे असंख्य पात्र उमेदवार आहेत, ज्यांची विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची आस आहे हे दिसून आले. त्यात पुन्हा प्राध्यापक या पदाचे महत्त्व काही वेगळेच आहे. म्हणजे एकदा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून तुम्ही लागलात किंवा चिकटलात की, पुढे आयुष्यभर चिंता करण्याची गरज नसते. उरलेल्या आयुष्यामध्ये एकच इतिकर्तव्य उरलेले असते आणि ते म्हणजे 'शहाणे करून सोडावे सकळजन.'

समाजाला मार्गदर्शन करण्यामध्ये ज्या विशिष्ट व्यवसायांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये वकील,डॉक्टर आणि प्राध्यापक यांचा समावेश असतो. प्राध्यापक म्हणून निवड होणे हा म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेवर बसलेला शेवटचा मोलाचा शिक्का आहे, असे समजले जाते.
सर्व नेट-सेटधारक आणि पीएच.डी. ही महत्तम पदवी प्राप्त असलेल्या उमेदवारांना त्यामुळेच प्राध्यापक होण्याचे आकर्षण असावे, यात काही नवल नाही. एखाद्या विषयात पदवी प्राप्त करून, त्यानंतर पदवी पदव्युत्तर शिक्षण घेऊन नेट-सेट पास होऊन किंवा पीएच.डी. प्राप्त करून घेऊन त्या तरुणाला करण्यासारखे एकच काम राहिलेले असते आणि ते म्हणजे प्राध्यापक होणे. उच्चतम शिक्षण घेतल्यामुळे असे लोक कष्टाचे काम करू शकत नाहीत.

कष्टाचे म्हणजे शारीरिक कष्टाचे नव्हे, तर एखाद्या कारखान्यात मॅनेजमेंट करण्याचे किंवा एखाद्या कंपनीत मोठ्या पदावर तांत्रिक, अशा प्रकारचे काम ते करू शकत नाहीत. त्यांनी करावे असे एकच काम असते आणि ते म्हणजे ज्ञानदान करण्याचे. या कामात फारसा वेळ जात नसल्यामुळे प्राध्यापक मंडळींना तसा भरपूर वेळ असतो आणि या वेळेचा सदुपयोग ते स्वतःसाठी आणि समाजासाठी जरूर करू शकतात, हे निश्चित आहे.

आजकाल सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल असते. अनेक व्याख्यानमाला असतात, अनेक पुरस्कार असतात. अशा कार्यक्रमांसाठी संयोजकांना प्रमुख पाहुण्यांची गरज पडत असते. तुम्ही एकदा प्राध्यापक झालात आणि थोडे सक्रिय असलात की, महिनाभरात एखादा तरी कार्यक्रम तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून गाजवू शकता. वक्तृत्व चांगले असेल तर व्याख्यानमालांची निमंत्रणे येत राहतात. अशा विविध प्रकारे समाजसेवा करण्याची आणि समाजाच्या ज्ञानात भर घालण्याची संधी मिळत असल्यामुळे बहुधा प्राध्यापक पदाच्या काही जागांसाठी शेकडो अर्ज येत असावेत, असे वाटते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news