गणेशोत्सव शांततामय वातावरणात साजरा करा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल | पुढारी

गणेशोत्सव शांततामय वातावरणात साजरा करा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे; पुढारी वृत्तसेवा : १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे गणेशोत्सवात सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नागरिकांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी गोयल बोलत होते. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पोलिस दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी विद्युत विभागाने दक्षता घ्यावी. तसेच महापालिकेने मोकाट गुराचा बंदोबस्त करावा. विर्सजनाच्या ठिकाणी स्वच्छता, निर्माल्य विर्सजन, लाईटची व्यवस्था, बॅरिकेट्स, रस्त्यावरील खड्ड्याची डागडूजी करावी. विसर्जन मिरवणुकीसाठी पुरेशी प्रकाशयोजना, विसर्जनस्थळी जीवरक्षकांच्या नियुक्तीच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या. मिरवणुक तसेच विसर्जन दरम्यान अनावश्यक विद्युत तारा तसेच झाडांची फाद्यांची छाटणी करणे, अशा आदी बाबींचे नियोजन करावे. तसेच मंडळाचे पदाधिकारी, नागरिकांनीही शासनाच्या मार्गदर्शक सूचना, नियमांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पोलिस अधीक्षक बारकुंड म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. गणेश मंडळांना परवानगीसाठी पोलीस मुख्यालय येथे एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच गणेश मंडळाच्या आरासच्या ठिकाणी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सूचना फलक तसेच माझा गणपती माझी सचोटी उपक्रमांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावर्षी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी येत असल्याने हे दोन्ही सण शांततेने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोयल व जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी केले. यावेळी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, मंडळांचे पदाधिकारी, नागरिक, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button