गणेशोत्सवासाठी शिवसेनेकडून ६३ हजार कोकणवासीयांना मोफत बससेवा | पुढारी

गणेशोत्सवासाठी शिवसेनेकडून ६३ हजार कोकणवासीयांना मोफत बससेवा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा – गणेशोत्सव आणि कोकण वासियांचे अतूट नाते आहे तसेच शिवसेना आणि कोकण वासियांचेही अतूट नाते आहे. हेच नाते जपत शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी मुंबईकरांसाठीही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे. मुंबई, ठाणे तसेच कल्याण डोंबिवली अशा तीन शहरांसाठी १५०० बसेस सोडण्यात येणार आहे. याचा फायदा जवळपास ६३ हजार कोकणवासीयांना होणार आहे.

शिवसेनेच्या वतीने अनेक विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाते असून याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसह यामध्ये मुंबई विभागाचा देखील समावेश करण्यात आला आहे. तिन्हीही विभागांसाठी मिळून १५०० बसेस सोडण्यात येणार आहेत. कल्याण डोंबिवलीसाठी आज तर ठाणे आणि मुंबईकरांसाठी १७ सप्टेंबर रोजी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती म्हस्के यांनी दिली आहे.

बसेसच्या बुकिंगसाठी आधीच शाखांमध्ये नोंदणी करण्यात आली असून त्याप्रमाणे नागरिकांना तिकीट देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. केवळ कोकणातच नव्हे तर कोकणच्या आजूबाजूला असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणीही जाण्यासाठी नागरिकांना या मोफत बससेवेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईकरांसाठी ४५०, ठाणेकरांसाठी ५०० तर कल्याण डोंबिवलीकरांसाठी ५५० अशा प्रकारे बसेस देण्यात आल्या आहेत.

उबाठा पक्षावर निशाणा

केवळ मतांसाठी कोकणवासीयांच्या वापर केला जातो. नंतर त्यांचा विसर पडतो. मात्र आम्ही कोकण वासियांचे ऋण विसरणार नसल्याचे सांगत इतर लोक मात्र त्यांचे ऋण विसरले असल्याचा टोला म्हस्के यांनी नाव न घेता उबाठा पक्षाला लगावला आहे.

Back to top button