Mars : मंगळावर ‘शार्कचे फिन’ आणि ‘खेकड्याची नांगी’! | पुढारी

Mars : मंगळावर ‘शार्कचे फिन’ आणि ‘खेकड्याची नांगी’!

वॉशिंग्टन : मंगळावरील अनेक खडकांमधून अनेकांना अनेक आभास होत असतात. कुणाला त्यामध्ये मनुष्याकृती दिसते तर कुणाला विविध पशुपक्षीही दिसतात. आता पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवर दोन असेच वेगळ्या आकाराचे दगड कॅमेर्‍यात टिपले आहेत. एका दगडाचा आकार शार्कच्या सहसा पाण्याबाहेर दिसणार्‍या पाठीवरील फिनसारखा असून दुसरा दगड खेकड्याच्या नांगीसारखा आहे.

पर्सिव्हरन्स रोव्हर 18 फेब्रुवारी 2021 या दिवशी मंगळभूमीवर उतरले. तेथील ‘जेझेरो’ असे नाव दिलेल्या विवरात हे रोव्हर फिरत असून प्राचीन काळी मंगळावर जीवसृष्टी होती का याचा शोध घेत आहे. या रोव्हरच्या कॅमेर्‍याने 18 ऑगस्टला टिपलेले छायाचित्र लक्ष वेधून घेणारे आहे. त्यामध्ये शार्कच्या फिनच्या तसेच खेकड्याच्या नांगीच्या आकाराचे दगड दिसतात. असा आभास होणे ही ‘पॅरेडोलिया’चा प्रकार असतो. आपण पाहिलेल्या द़ृश्याची आधी पाहिलेल्या वस्तूशी तुलना करून त्याचा अर्थ लावण्याची मेंदूला सवय असते. त्यालाच ‘पॅरेडोलिया’ असे म्हटले जाते.

मंगळावरील दगडांमधून असे आभास निर्माण होणे ही एक जुनीच घटना आहे. एका दगडाच्या सावलीमुळे या दगडात मानवाच्या चेहर्‍याचा भास निर्माण होत असल्याने त्याची 1970 व 80 च्या दशकात चर्चा होत होती. मंगळावरील एका डोंगरात अशाच सावलीने चक्क दरवाजाचाही आभास निर्माण केला होता. ‘हा खेळ सावल्यांचा’ हे जरी वैज्ञानिक म्हणत असले तरी अनेक ‘एलियनवादी’ लोक अशा गोष्टींचा संबंध मंगळावरील परग्रहवासीयांशी जोडत असतात!

Back to top button