मराठा आरक्षणावरून खडसेंच्या घरातच वाद ; सासरा- सुनेत जुंपली | पुढारी

मराठा आरक्षणावरून खडसेंच्या घरातच वाद ; सासरा- सुनेत जुंपली

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जळगावात सासरा-सुनेत जुंपली आहे. आरक्षणाचे आश्वासन पूर्ण करा, असा टोला एकनाथ खडसे यांनी सरकारला लगावल्याने खडसे आणि भाजपच्या खासदार असलेल्या त्यांच्या सून रक्षा खडसे यांच्यातील वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. संसदीय कायद्यात दुरुस्ती करा आणि मर्यादा वाढवून ५० टक्क्यांच्या वर आरक्षण द्या. खरा जर न्याय द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती केल्याशिवाय न्याय शक्य नाही. हे प्रकरण अधिक न वाढवता, असंतोष न पसरवता लोकसभेच्या अधिवेशनात घटनादुरुस्ती करणार आणि मराठा समाजाला आरक्षण देणार हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यावर खासदार रक्षा खडसे यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंचा समाचार घेतला. रक्षा खडसे या रावेरच्या भाजपच्या खासदार आहेत. त्या भुसावळमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, मागच्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते मिळू शकले नाही. आजही आमचे सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आरक्षणाबाबत विरोधकांनी राजकारण न करता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करायला हवं, असा सल्ला रक्षा खडसे यांनी दिला आहे.

फोडाफोडीचे राजकारण राष्ट्रवादीने याआधी केले होते. आज वेगळे काय? आधी राष्ट्रवादीचा सहकारी पक्ष हा काँग्रेस होता. शिवसेना कधीच राष्ट्रवादीचा मित्र पक्ष नव्हता. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने जाऊन सत्ता स्थापन केली. मग आम्ही भाजपानेही त्याच मार्गाने सत्ता स्थापन केली तर त्यात वेगळे काय? असा सवाल रक्षा खडसे यांनी केला आहे.

हेही वाचा :

Back to top button