जनसंवादाला विसंवादाचा अपशकून; जिल्हाध्यक्षांच्या नियोजनाचा आ. थोरातांना फटका | पुढारी

जनसंवादाला विसंवादाचा अपशकून; जिल्हाध्यक्षांच्या नियोजनाचा आ. थोरातांना फटका

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : कॉग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या नमनालाच अपशकून झाल्याचे आज दिसून आले. भुईकोट किल्ला ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार्‍या पदयात्रेकडे पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्यामुळे काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नामुष्की ओढवली. त्यांनी पदयात्रा न काढता कारमधून जात छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर नव्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन केले.

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने जिल्ह्यातील एक हजार गावांत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात आज सोमवारपासून भुईकोट किल्ला येथून झाली. किल्ला, जीपीओ चौक, माणिक चौक, माळीवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रा बुरूडगाव रस्त्यावरील नियोजित कार्यालयापर्यंत जाणार होती. या मार्गावर आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढली जाणार होती. या नियोजनाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्यावर होती.

त्यांनी जिल्हा काँग्रेस पदा धिकार्‍यांच्या बैठकाही घेतल्या. आज सकाळी मात्र या संवाद यात्रेकडे पदा धिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली. आ. लहू कानडे, हेमंत ओगले, नगर शहराचे अध्यक्ष किरण काळे, सचिन गुजर यांच्यासह निवडक कार्यकर्ते वगळता कोणीच उपस्थित नव्हते. नागवडेंच्या नियोजनाचा फटका आमदार थोरात यांनाच बसल्याचे दिसून आले. निवडक कार्यकर्ते पाहून आमदार थोरात पदयात्रा न काढता कारने थेट बुरूडगाव रोडवर पोहोचले. तेथे शंभराच्या आसपास कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले.

…आणि हे करणार भाजपशी दोन हात..?

नगर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून आ. बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय नगर शहरातून किरण काळे, श्रीगोंद्यातून जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र नागवडे हे विधानसभेसाठी तयारी करत आहेत. जनसंवाद यात्रेचा फज्जा पाहता काँग्रेस भविष्यात भाजपशी दोन हात कसे करणार? अशी चर्चा राजकीय वुर्तळात सुरू झाली. नगर जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी द्यायची असेल तर आ. थोरात यांना आधी जिल्हा पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय घडवून आणावा लागेल, अशी माहिती एका पदाधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

ना होर्डिंग, ना झेंडे; तालुकाध्यक्षांचीही दांडी

जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे हे ‘वजनदार’ नेते आहेत. मात्र त्यांचे जिल्ह्यातील इतर पदाधिकार्‍यांशी फारसे सख्य नसल्याचे समजते. त्यातूनच जनसंवादाकडे पाठ फिरविल्याची कुजबूज ऐकू आली. काँग्रेसची जनसंवाद यात्रा आज सुरू होणार, याची वातावरणनिर्मितीही करण्यात आलेली नव्हती. ना रस्त्यांवर बॅनर ना होर्डिग; ना काँग्रेसचे झेंडे! हे जिल्हाध्यक्षांच्या नियोजनाचे अपयश असल्याचेच बोलले जात आहे. नगर वगळता इतर तालुक्यांच्या अध्यक्षांनीही यात्रेला दांडी मारली. सभास्थळी अडीचशे खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. त्यातील कित्येक रिकाम्याच होत्या. आ. थोरातांनी उपस्थितांना संबोधित करत नंतर श्रीगोंदा तालुक्यातील जनसंवाद कार्यक्रमाकडे प्रयाण केले.

शहर काँग्रेस कमिटी पुन्हा काढणार ‘जनसंवाद’

जनसंवाद यात्रा यशस्वीतेची जबाबदारी ही जिल्हा काँग्रेस कमिटीकडे होती. नगर शहर काँग्रेस कमिटी त्यापासून अलिप्त होती. जिल्हा काँग्रेस कमिटीचे गलथान नियोजन पाहता आ. थोरात यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते. आजचा फज्जा पाहता नगर शहरात पुन्हा जनसंवाद यात्रा काढण्यात येणार असून त्याची जबाबदारी नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीवर सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. माजी मंत्री तथा निरीक्षक म्हणून चंद्रकांत हंडोरे नगरमध्ये आले तेव्हा त्यांच्या सभेचे नियोजन नगर शहर जिल्हा काँग्रेसकडे होते. ते यशस्वी झाले. नगर शहर काँग्रेस थाटात कार्यक्रम करत असताना जिल्हा काँग्रेस मात्र अपयशी ठरल्याची चर्चा नंतर आपसांत ऐकू आली.

हेही वाचा

सकल मराठा समाजाचा कडेगांव प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

बसल्या बसल्या पाय हलवणे चांगलेच! जाणून घ्या अधिक

ई-चलन मधील पळवाटा बंद होणार, राज्यभरात कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्याचा प्रश्न

Back to top button