त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी धावणार अडीचशे जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. येथे श्रावण महिन्याच्या दर सोमवारी विशेषत: तिसर्या श्रावणी सोमवारसाठी राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ४) भाविकांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने सुमारे २५० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते.
श्रावण महिन्याच्या सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची लगबग सुरू असते. त्र्यंबकेश्वरला भाविकांची मोठी गर्दी होत असते. विशेषतः तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त फेरीसाठी भाविक दाखल होतात. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रविवारपासूनच भाविक त्र्यंबकेश्वर परिसरात दाखल होत असतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रविवारी (दि. ३) सायंकाळपासून जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारीही जादा बसेस उपलब्ध असणार आहेत.
दरम्यान, जुने सीबीएस येथून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सुटणार असल्याने, या बसस्थानकातील अन्य मार्गांसाठीच्या बसेस महामार्ग बसस्थानकातून सुटणार आहेत. त्यानुसार सटाणा, साक्री, नंदुरबार, नवापूर, कळवण, सुरगाणा, सतशृंगगड, पेठ, हरसूल, बालापाडा, पिंपळगाव, शिवणगाव, गणेशगाव, धुमोडी, बेजे, इगतपुरी, कुशेगाव, घोटी यांसाठी बसेस महामार्ग बसस्थानकातून रवाना करण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.
हेही वाचा :