Asia Cup 2023 : इशान किशनला खेळवायचे कुठे?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ‘आशिया कप 2023’ सुरू झाला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. टीम इंडियाला 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. या सामन्यात के. एल. राहुलऐवजी इशान किशन खेळणार आहे. परंतु, त्याला कोणत्या स्थानावर खेळवायचे याची चिंता कर्णधार रोहित शर्माला लागून राहिली आहे.
के. एल. राहुल ‘आयपीएल’ स्पर्धेत जखमी झाला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर राहुलची ‘आशिया कप’ संघात निवड झाली. मात्र, संघ श्रीलंकेला रवाना होण्याच्या काही तास आधी राहुल पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नसल्याची कोच द्रविडनी माहिती दिली. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा अडचणीत सापडला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये के. एल. राहुल खेळणार नाही. त्यामुळे इशान किशन यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट आहे; पण यामुळे ‘प्लेईंग इलेव्हन’चे गणित बिघडू शकते.
रोहित शर्मासाठी धर्म संकट म्हणजे, इशान किशनचा ‘प्लेईंग इलेव्हन’मध्ये समावेश करणे आता अनिवार्य आहे. इशान किशन चांगला खेळतोही, वेस्ट इंडिज दौर्यावर त्याने दमदार फलंदाजी केली होती. मात्र, इशान किशन कुठे फलंदाजी करणार हा प्रश्न आहे.
राहुल पाचव्या क्रमांकावर आणि सलामी या दोन्ही ठिकाणी चांगला खेळतो; पण इशान किशनने मधल्या फळीत जास्त फलंदाजी केलेली नाही. जर तो सलामीला आहे, तर ते टीम इंडियासाठी चांगले सिद्ध होईल.
अशा परिस्थितीत आता इशान किशनसाठी कोण बलिदान देणार हा मुद्दा समोर येतो. त्यात केवळ दोन खेळाडूंची नावे आहेत. शुभमन गिल आणि विराट कोहली. शुभमन आणि विराटच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झाला, तर भारतीय संघासमोर मधल्या फळीत पुन्हा संकट उभे राहणार आहे. कारण, श्रेयस अय्यरही ‘आशिया कप’ स्पर्धेत दुखापतीनंतर थेट पुनरागमन करत आहे.
के. एल. राहुल खेळत नसल्यामुळे आता रोहितसोबत कोण सलामी देणार, हा प्रश्न आहे. इशान किशनने वेस्ट इंडिज दौर्यावर सलामी देताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. शुभमन गिलने रोहितसोबत वन-डेमध्ये काही काळ डावाची सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत इशान किशनला सलामी दिली, तर शुभमन गिल तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.
शुभमन गिलने तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास विराट कोहलीला बलिदान द्यावे लागेल आणि तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. मात्र, विराटच्या फलंदाजीच्या क्रमाशी छेडछाड केल्याने टीम इंडिया अडचणीत येऊ शकते, अशी भीती आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा कोणत्या बॅटिंग कॉम्बिनेशन घेऊन मैदानात उतरतो, हे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कळेल.